नांदेड : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे़ शुक्रवारी नांदेडचा पारा ४४़५ अंशांवर गेला होता़ गेल्या पाच वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी करण्यात आली़ तर पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तविली आहे़ उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असून यंदाचा उन्हाळा नांदेडकरांना तापदायक ठरत आहे़गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे दुपारच्यावेळी शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून, सकाळी अकरा वाजेनंतर घराबाहेर पडण्यास कोणीही धजावत नाहीत. येत्या काही दिवसांत अजून उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़एप्रिलच्या दुस-या आठवड्यात नांदेडचे तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेले होते़ त्यानंतर मध्यंतरी ते ४३़५ अंशांवर होते़ परंतु मागील आठवड्यात सलग दोन दिवस अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पारा ३५ अंशापर्यंत खाली घसरला होता़ त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता़ परंतु आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला आहे. असेच काहीसे चित्र आहे़ गेल्या पाच वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद शुक्रवारी करण्यात आली़ सकाळी दहा वाजेपासूनच पारा वाढला होता़त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता़ सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचे चटके लागत होते़ दिवसभर नांदेडातील रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी होती़ शुक्रवारच्या बाजारातही सायंकाळी ऊन उतरल्यावरच खरेदीसाठी गर्दी झाली होती़ प्रत्येकजण उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता़ बाजारात टोपी आणि छत्री दुकानांवरही गर्दी होती़ पुढील दोन दिवसांत तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे एप्रिलअखेर आणि त्यानंतर मे महिना नांदेडकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची शक्यता आहे़उन्हापासून बचावासाठी अशी घ्या काळजीयंदाच्या उन्हाळ्यात नांदेडचे तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे़ अधिक श्रमाची कामे करताना काळजी घ्यावी़ पाणी जास्त प्यावे़डोक्याला रुमाल अवश्य बांधावा़ गडद रंगाचे कपडे वापरणे टाळावे़ पाणीदार फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा जेवणात समावेश करावा़ मसालेदार पदार्थ खाऊ नयेत़, अशी प्रतिक्रिया फिटनेसतज्ज्ञ डॉ़अनिल पाटील यांनी दिली़२०१४ मध्ये होते ४४़२ तापमान
- पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये एप्रिल महिन्यात ४४़२ अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती़ नांदेडचा पारा दरवर्षी उन्हाळ्यातील मे महिन्यात ४५ अंशापर्यंत जातो़ परंतु यंदा एप्रिलमध्येच नांदेडचे तापमान ४४़५ अंशांवर गेले होते़ त्यामुळे मे महिना आणखी तापदायक ठरण्याची शक्यता आहे़ दिवसभरात आर्द्रता १७ टक्के होते़ त्यामुळे नागरिक घामाघूम झाल्याचे मल्टीपर्पज येथील हवामान विभागाचे समन्वयक बालासाहेब कच्छवे यांनी सांगितले़
- एप्रिल महिन्यात नांदेडचा पारा ४५ अंशांवर जातो़ परंतु यंदा तो यापुढेही जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ पुढील दोन दिवसांतच नांदेडचे तापमान ४५ अंशांवर जाऊ शकते़ त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे़
प्राणी मानवी वस्त्यांकडेजिल्ह्यात भोकर, किनवट, माहूर, कंधार या भागात जंगलाचा मोठा भाग आहे़ या परिसरात नेहमी हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन नागरिकांना घडत असते़ परंतु गेल्या काही दिवसांत जंगलातील पाणवठेही आटले आहेत़ त्यामुळे पाण्याच्या शोधात प्राणी मानवी वस्त्यांकडे येत आहेत़ काही दिवसांपूर्वी भोकर येथे अस्वलाने जनावरांवर हल्ला केल्याची घटना घडली होती़ तर माहूर परिसरात बिबट्या दिसला होता़ त्यामुळे या पुढील काळात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे वनविभागाने जंगलात पाणवठे तयार करण्याची गरज आहे़