अर्धापूर (जि. नांदेड) : इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असणारी चिमुकली अचानक वरून खाली पडली असता गंभीर जखमी झाली. तिला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये नेल्याने चिमुकल्या मुलीचे प्राण वाचले. याकामी महामार्ग पोलिसांनी मोठा पुढाकार घेतला.
अर्धापूर शहरातील फुलेनगर येथील दयालसिंघ ठाकूर यांच्या येथे भाड्याने राहत असलेल्या शिक्षिका रेणुका सुदाम नाईक यांची मुलगी अनुष्का शिवाजी सुरकुटे (२) छतावर खेळत असताना अचानक तोल गेला व खाली पडली. डोक्याला जबर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली व बेशुद्ध झाली. वडील बाहेरगावी गेले होते व आई रेणुका नाईक या जि.प. हायस्कूल अर्धापूर येथील शाळेत शिकविण्यासाठी नोकरीवर गेल्या होत्या. घरी कोणीही नव्हते अशावेळी घरमालक दयालसिंघ ठाकूर यांनी त्या चिमुकलीला महामार्ग पोलीस केंद्र (वसमत फाटा) अर्धापूर, नांदेड येथे आणले. क्षणाचाही विलंब न करता महामार्ग पोलीस गजानन कदम, रमाकांत शिंदे यांनी रुग्णवाहिकेतून त्या चिमुकलीला नांदेड येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी त्या मुलीवर उपचार केले. वेळेत उपचारासाठी आणल्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले.
२१ कि.मी.चे अंतर सोळा मिनिटांत पार
अर्धापूर महामार्ग केंद्र पोलीस प्रशासनाने नांदेड कंट्रोल रूमला वायरलेसद्वारे संपर्क केला. यावेळी नांदेड येथील पथकाने राज कॉर्नर ते वजिराबाद रस्ता मोकळा ठेवला. रस्ता मोकळा असल्याने अर्धापूर ते यशोसाई हॉस्पिटल २१ कि.मी.चे अंतर रुग्णवाहिकेने १६ मिनिटांत पार केले.