नांदेड : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून साधारणत: तीन वर्षांपूर्वी प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली होती; परंतु या कक्षाबाबत महिलाच अनभिज्ञ असून आता तर या कक्षाला गोदामाचे स्वरूप आले आहे. नांदेड बसस्थानकातील हिरकणी कक्ष तर कुलूपबंदच होता. विशेष म्हणजे त्यावर साधा फलकही लावण्यात आला नव्हता. त्यामुळे स्तनदा मातांची मात्र मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.
प्रवासात महिलांना सर्वाधिक त्रास हा लघुशंका आणि चिमुकल्यांना दूध पाजण्याचा असतो. महिला आडोसा घेऊन अनेक ठिकाणी चिमुकल्यांना दूध पाजतात. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा महिलांसाठी प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष स्थापन केले. त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला होता; परंतु योजनेबाबत अनेक महिलांनाच माहीत नाही. नांदेड बसस्थानकावरील हिरकणी कक्ष कुलूपबंद आहे. या कक्षाची चावी एका महिलेकडे आहे.
प्रवासी महिलेने मागणी केल्यानंतर त्यांना ती चावी उपलब्ध करून दिली जाते. असे प्रशासनाचे म्हणणे आहे; परंतु आजघडीला तरी या हिरकणी कक्षाचे गोदामातच रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे.
कक्षाबाबत महिला अनभिज्ञच
प्रत्येक बसस्थानकावर हिरकणी कक्ष उघडण्यात आला आहे; परंतु हा कक्ष नेमका कुठे आहे, तो कुणासाठी आहे, याची पुसटशी कल्पनाही ग्रामीण भागातील महिलांना नाही. त्यामुळे बसस्थानकावर असतानाही महिलांकडून क्वचितप्रसंगीच या कक्षाबाबत विचारपूस केली जाते. त्यामुळे त्याचा वापर करणाऱ्यांची संख्या तर नगण्यच आहे.