गंगाधर तोगरे।कंधार : कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. पुरातत्त्व विभागाचा याकडे कानाडोळा होत असल्याचा सूर इतिहासप्रेमी, पर्यटकांतून उमटत आहे.कंधार शहर बाराशे वर्षांचा इतिहास जागवत आपले ऐतिहासिक महत्त्व टिकवून आहे. शहर आणि परिसरात बांधकाम, खोदकाम, शेती काम करताना जमिनीच्या उदरात दडलेली अनेक मूर्तिशिल्पे आढळतात. येथे क्षेत्रपाल मंदिर, मंडलसिद्धी विनायक मंदिर, कृष्णेश्वर मंदिर, कालप्रिय मंदिर, बंकेश्वर मंदिर, जैन मंदिर, बौद्ध विहार, बडी दर्गाह, छोटी दर्गाह आदींमुळे हा भाग विविध धार्मिक स्थळांनी ओळखला जातो. तसेच हा भाग अप्रतिम मूर्तिशिल्पे, कलात्मक रेखाटने व त्याच्या सौंदर्याने बहरला आहे.या भागातील अनेक मंदिरे कालोघात पडझडीने नष्ट झाली. त्यांचे अनेक अवशेष, खिंडारे पहायला मिळतात. तरीही जैन मंदिर, बौद्ध मूर्ती, अष्टभुजादेवी मूर्ती, द्वादशभुजा देवी आदीचे अतिशय चांगल्याप्रकारे जतन करण्यात या भागातील अनेकांनी यश मिळविले. परंतु, अनेक मूर्तिशिल्पांचे संवर्धन करून सौंदर्य जतन करण्यात पुरातत्त्व विभाग कमी पडत असल्याचे चित्र आहे.भुईकोट किल्ल्यात अनेक मूर्तिशिल्पे उघड्यावर ठेवण्यात आलेले आहेत. ऊन, पाऊस, वादळ-वारा, गारपीट यांचा आघात सहन करत आहेत. अतिशय कौशल्याने निर्माण केलेल्या मूर्तीदुर्लक्षाने त्यांचे सौंदर्य पुसटसे होत आहे. पर्यटकांना असे अस्ताव्यस्त असलेले मूर्तिशिल्पे पाहताना इतिहासात डोकावता येते. आणि दुसरीकडे याकडे होत असलेले दुर्लक्ष वेदनादायी ठरते. पुरातत्त्व विभागाने आधुनिक वस्तूसंग्रहालय निर्माण करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावेत. असा सूर इतिहासप्रेमी, पर्यटक, नागरिकांतून उमटत आहे. क्षेत्रपाल भैरव, चंद्रशिळा, महादेव, नंदी, पार्वती, हत्ती, गणेश, कौमारी, वैष्णवी, महिषासुरमर्दिनी, लज्जागौरी, चामुंडा आदी मूर्तीचा उघड्यावरचा हा वनवास कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.बहाद्दरपुरा येथे मानार नदी काठावर शांतीघाट परिसर पर्यटकांना इतिहासात व निसर्गसौंदर्यात रममान करतो. माजी खा.व आ.भाई डॉ. केशवराव धोंडगे, माजी आ. भाई गुरूनाथराव कुरूडे यांनी ऐतिहासिक मूर्तिशिल्पे संवर्धन करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे राष्ट्रकुट भवन वस्तूसंग्रहालय अडीच दशकांपूर्वी अस्तित्वात आले. अनेक मूर्तिशिल्पे या ठिकाणी जतन करण्यासाठी पोषक ठरले. परंतु याचा आकार लहान व मूर्तींची संख्या अधिक असे झाल्याने अनेक मूर्तिशिल्पे बाहेर उघड्यावर आहेत. वस्तूसंग्रहालयातील मूर्तिशिल्पे स्वतंत्र मनुष्यबळाअभावी पहायला मिळत नाहीत.
ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेल्या या भागातील मूर्तिशिल्पे वेरूळ-अजिंठा येथील तोडीचे आहेत. परंतु कंधार व परिसरातील हा समृद्ध वारसा जतन करणे काळाची गरज आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाने किल्ल्यात विशेष लक्ष द्यावे. बहाद्दरपुरा येधील वस्तूसंग्रहालयात मनुष्यबळ निर्माण करून योग्य देखभाल करावी आणि नवीन पिढीला इतिहास माहिती करून घेण्यासाठी संधी द्यावी - माधवराव पेठकर (सरपंच, बहाद्दरपुरा ता.कंधार)