- अनुराग पोवळे नांदेड - जिल्ह्यात गोदावरी नदीतून नांदेड, मुदखेड, उमरी, लोहा, नायगाव आदी तालुक्यातून बिहारी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात होता. खुद्द जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी मध्यरात्री नांदेड व मुदखेड तालुक्यात कारवाई करत 200 ब्रास वाळू जप्त केली होती. या कारवाईत नांदेड तालुक्यातील भणगी येथील 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारी मजूरांविरुद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात चोरी, पर्यावरण अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळू लिलाव न झाल्याने अवैध वाळू उपशाला ऊत आला होता. कोरोना संकटासह इतर कारणांमुळे या वाळू माफियाकडे महसूल विभागाने दुर्लक्षच केले होते. या वाळू माफियानी स्थानिक तलाठी,मंडळ अधिकारी यासह नायब तहसीलदारांशी संधान साधून आपले चांगभले केले. विशेष म्हणजे या वाळू उपशासाठी पहिल्यांदाच बिहारी टोळ्यांचा वापर सुरु केला आहे. पावसाळा संपताच हजारो बिहारी टोळ्यांनी गोदावरी नदीचा ताबा घेतला होता. बांबू व तरफ्यांच्या सहायाने वाळू उपसा केला जात होता.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी 14 डिसेंबरच्या रात्री मुदखेड तालुक्यातील ब्राह्मणवाडा, नांदेड तालुक्यातील वांगी, नागापुर यासह भणगी येथे पोलीस फौजफाटा घेवून मोठी कारवाई केली होती. तीन दिवस ही कारवाई सुरुच होती. गोदावरी काठी असलेल्या भणगी गावातील शेतामध्ये 34 शेतकऱ्यांनी बिहारी टोळ्यांना राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली होती. महसूल आणि पोलिसांनी या जागांचे संयुक्त पंचनामे केले. या ठिकाणाहून शेतकरी बिहारी टोळ्यांच्या माध्यमातून अवैध वाळू उपसा करित होते. या प्रकरणी विष्णुपुरीचे मंडळ अधिकारी कोंडिबा नागरवाड यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी 34 शेतकऱ्यांसह 438 बिहारीविरुद्ध चोरी, पर्यावरण सरक्षण अधिनियम, महसूल अधिनियम आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंडगीर हे करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात यापूर्वी बिहारी टोळीविरुद्ध मुदखेड आणि उमरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पण दुसरीकडे सोनखेड पोलीस ठाणे आणि लोहा तहसीलच्या सहकार्याने बेटसांगवी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या 12 बिहारी मजूराना समज देऊन सोडण्यात आले हेही विशेष. जिल्ह्यात बिहारी टोळ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात असताना सोनखेड पोलिसांनी या बिहारीना कोणती समज दिली असावी याबाबत चर्चा सुरु आहे.