महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात ३३०० पेक्षा अधिक कर्मचारी - अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वच कर्मचार्यांना कोरोना काळात पगारासाठी तीन ते चार महिने थांबावे लागले. कोरोना काळात सेवा बजावणार्या या कोरोना योद्ध्यांचा सन्मानही करण्यात आला. परंतु, मागील काही दिवसांपासून ठराविकच ड्युटी मिळत असल्याने पगार कपात होवून येत आहे. त्यामुळे या तुटपुंज्या पगारावर संसाराचा गाडा हाकणे कठीण होत चालले आहे. त्यातून चालक, वाहकांत नैराश्य निर्माण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे एसटीच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देणार्या चालक, वाहकांना संपूर्ण ड्युटी आणि संपूर्ण पगार मिळावा यासाठी सरकार, प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
नियोजनबद्ध कारभाराने उत्पन्नामध्ये होतेय वाढ
विभागीय कार्यालयाकडून कोरोनाचा सामना करत प्रवासीसेवेसाठी योग्य नियोजन केले जात आहे. त्यामुळेच लाॅकडाऊन काळात उत्पन्नाच्या बाबत नांदेड विभाग अव्वलस्थानी राहिला आहे. आजघडीला नांदेड विभागास जवळपास ५२ लाख रूपयांचे उत्पन्न होत आहे. कोरोना पूर्वी दररोजचे उत्पन्न ७० लाख रूपये होते.
तीनशेंहून अधिक चालक-वाहक दररोज सुटीवर
कोराेनामुळे कमी झालेल्या प्रवाशी संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. तशी चालक, वाहकांना ड्युटी मिळत आहे. परंतु, कोरोना प्रसारापूर्वीप्रमाणे अद्याप बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे नांदेड विभागातील जवळपास दहा ते बारा टक्के म्हणजे तीनशे ते चारशे चालक, वाहकांना दररोज सुट्टी दिली जाते. त्यातील काहींनी पगारी तर काही बिनपगारी सुटीवर असतात. त्यामुळे आपसुकच पगार कमी होत आहे.
पगार कपात होवू नये
बससेवेची धुरा असणार्या चालक वाहकांनाच पगार कपातीचा सामना करावा लागतो. बससेवा पूर्णपणे सुरू न झाल्याने अनेकांना बिनपगारी सुट्टी घ्यावी लागते. त्यातून चालक, वाहकांना महिन्याकाठी तीन ते चार हजारांचा फटका सहन करावा लागत आहे. हे नुकसान टाळणे गरजेचे आहे.
- अतिश तोटावार
युनियन लीडर, नांदेड