जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा सर्वोच्च पातळीवर पोहोचला असताना कोविड सेंटरची संख्या अत्यंत कमी आहे. नांदेड शहरात केवळ महसूल भवन हे एकमेव कोविड सेंटर सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयातच हे केंद्र थाटण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने ज्या उपाययोजना केल्या त्या दुसऱ्या लाटेच्या वेळी केलेल्या दिसत नाहीत. औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात इमारती ताब्यात घेऊन कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात आली. परंतु नांदेडमध्ये मागील वेळी सुरू असलेले कोविड सेंटरदेखील अजून सुरू झाले नाही. शाळा आणि महाविद्यालये तसेच अनेक निवासी व्यवस्था असलेल्या इमारती जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येतात. या इमारतींना अधिग्रहित करून तेथे कोविड केअर सेंटर सुरू करणे तसेच आरोग्य विभागाचे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे.
कोविड सेंटर उपलब्ध नसल्याने बाधितांना नाइलाजाने गृहविलगीकरणात राहावे लागत आहे. ज्यांच्याकडे गृहविलगीकरणाची पुरेशी व्यवस्था नसेल किंवा घरात वयोवृद्ध नागरिक असतील, त्यांनाही ही सुविधा अपरिहार्य म्हणून स्वीकारून जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. काही ठिकाणी अख्खे कुटुंबच बाधित आल्यानंतर त्यांच्या घरात कोणीही कर्ता नसतो. अशा परिस्थितीत काही बाधितांना नाइलाजाने बाजारपेठेत जाऊन साहित्य आणावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रेमडेसिवीरचा तुटवडा
जिल्ह्यातील गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक ठरते. परंतु या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच हे इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी दिली.