नांदेड : शासकीय रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एकाच दिवशी २४ मृत्यू झाल्यानंतर सरकारने त्यातून काही तरी बोध घेऊन सुधारणा करण्याची अपेक्षा होती. परंतु सरकारने अनास्था दाखविली. त्यामुळे रुग्णालयात आतापर्यंत झालेले ४१ मृत्यू हे सरकारने केलेले खूनच आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार हे बुधवारी नांदेडात आले होते. दुपारी यांनी शासकीय रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, हाफकिनला कोट्यवधी रुपये देऊन ठेवले होते. परंतु त्यांनी औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे प्राधिकरण नेमण्यात आले. परंतु त्यांच्याकडूनही गेल्या आठ महिन्यांपासून औषधी आली नाही. रुग्णालयाने स्थानिक स्तरावर ७० लाखांची औषधी खरेदी केली होती. परंतु लाखो रुग्णांना ही औषधी कशी पुरणार? ५० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. सफाई कामगारांचे टेंडर मुंबईवरून तीन वेळेस रद्द होते. मनासारखे झाले की टेंडर रद्द केले जाते. मंत्र्यांकडूनही दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. औषधींचा पुरेसा साठा असल्याचे धादांत खोटे बोलले जात आहे. कळवा येथील मृत्यू प्रकरणाचा अहवाल अद्याप समोर आला नाही. नांदेडचेही तसेच होणार आहे. परंतु आम्ही यांना उघडे पाडू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
आमदारांना पोसायला कोट्यवधींचा निधीआमदारांना आपल्याकडे ठेवण्यासाठी त्यांना पोसण्यासाठी ५०० कोटींचा निधी दिला जात आहे. परंतु यांच्याकडे औषधी खरेदीसाठी पैसे नाहीत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नांदेडात येण्यास वेळ नाही. कारण ते दिल्लीत पळतात. दोन दिवस उशिरा दिल्लीत गेले असते तर काय फरक पडला असता? परंतु लोक मरू देत, आम्ही आमचं राजकारण करणार! अशी त्यांची भूमिका आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. तसेच मयताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.