हदगाव (नांदेड ) : तालुक्यात पशूवैद्यकीय दवाखान्याची संख्या १३ आहे ; पण डॉक्टर अकराच आहेत़ दोन दवाखाने डॉक्टराविनाच चालतात. यामध्ये तळणी व जांभळा या दवाखान्याचा समावेश आहे.
अडीच लाख पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हदगाव तालुक्यात श्रेणी-१ चे सहा व श्रेणी- २ चे सात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. श्रेणी-१ मध्ये निवघा, तळणी, हदगाव, तामसा, मनाठा व घोगरीचा समावेश आहे़ तर श्रेणी- २ मध्ये आष्टी, वाळकी, लोहा, जांभळा, पाथरड, चाभरा, पिंपरखेड या गावांचा समावेश आहे़ श्रेणी-१ मधील तळणी येथील डॉक्टर आॅगस्टमध्येच सेवानिवृत्त झाल्याने ते पद रिक्त आहे़ श्रेणी-२ मधील जांभळा येथील डॉक्टरची जूनमध्ये बदली झाली तेव्हापासून हे पद रिक्तच आहे़
या दोन्ही दवाखान्यांतर्गत येणार्या गावांतील पशुपालकांना पशुधन उपचारासाठी पट्टीबंधक किंवा परिचालकावरच विसंबून रहावे लागत आहे़ पशूवैद्यकीय अधिकारी, सहा़पशुधन अधिकारी यांची प्रत्येकी १ पद रिक्त, पशुधन पर्यवेक्षक एकूण ११ असून १ पद रिक्त, पट्टीबंधक पदे ६ असून त्यातील १ पद रिक्त, परिचर एकूण १९ पदांपैकी ४ रिक्त आहेत. वाळकी व आष्टी येथील दवाखाने मोडकळीस आले आहेत़ त्यांना संरक्षक भिंतही नाही़ हदगावला नवीन इमारत झाली, पण इतर बारा दवाखान्यांची वारंवार दुरुस्तीच करण्यात आलेली आहे़ पशूचे लसीकरण, औषधोपचार करण्यासाठी पशू पालकांना खाजगी कंपनीच्या डॉक्टरांचीच मदत घ्यावी लागते़ कारण गावे आणि दवाखाने यातील अंतरही बरेच लांब आहे.