जिल्ह्यात दररोज पाचशेहून अधिक अत्यवस्थ रुग्णांना दाखल करावे लागत आहे. त्यात इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. १०० इंजेक्शनची मागणी केल्यावर २० मिळत आहेत, त्यामुळे उर्वरित ८० रुग्णांचे नातेवाईक भटकंती करीत आहेत. त्यामुळे सिटी स्कोर दहाच्या पुढे असल्यास रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, त्यानंतरही इंजेक्शनचा घोळ मिटलेला नाही, दररोज इंजेक्शनसाठी बोंबाबोंब सुरू आहे. यासाठी नेमलेली समिती आणि नियंत्रण कक्षही नावालाच उरला आहे. त्यामुळे रविवारी जिल्हाधिकारी यांनी याबाबत नव्याने आदेश काढले आहेत. कोविडवर उपचार करणाऱ्या संलग्न औषध विक्रेत्याने त्याचा परवाना, रुग्णांची माहिती यासह इतर कागदपत्रे घेऊन घाऊक औषध विक्रेता किंवा एजंट यांच्याकडे नेमके किती रुग्णांना इंजेक्शन द्यावे लागणार याची पुढील तीन दिवसांची मागणी नोंद करावी. ज्या रुग्णालयात औषधी दुकाने नाहीत त्यांनी ती स्वतः खरेदी करून रुग्णांना द्यावी, त्याचे सर्व अभिलेखे भरावीत. रुग्णाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही रुग्णालयाची आहे. ते रुग्णांच्या नातेवाईक यांना आणायला लावू नये. रुग्णालयांनी कोणत्या रुग्णाला किती इंजेक्शन दिले त्याचा तपशील ठेवावा. त्यासाठी इंजेक्शनचे लेबल रुग्णांच्या केसपेपरला लावावे. यासह इतर अनेक बाबी आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तरी इंजेक्शनसाठी होणारी धावपळ थांबेल अशी आशा आहे.
इंजेक्शन उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णालयांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:16 AM