जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ
नांदेड - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरीच्या दुचाकींचा तपास लागत नसल्याने तक्रारदारांमध्ये अस्वस्थता आहे. सोमवारी जिल्ह्यात दुचाकी चोरीचे तीन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुदखेड तालुक्यातील गंज येथे सय्यद मोईज सय्यद मोईन यांची एमएच २६, डीपी ३७७७ या क्रमांकाची इनफिल्ड ही ८० हजार रुपये किमतीची दुचाकी लांबविण्यात आली. हिमायतनगर येथील गणेश मंदिराजवळ पोलीस कर्मचारी नितीन गणेश राठोड यांनी एमएच २६, एपी २२४४ या क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. या दुचाकीसह विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून माळटेकडी परिसरात सुनीलसिंह प्रतापसिंह ठाकूर यांची एमएच २६, बीव्ही ९४०७ ही दुचाकी लांबविण्यात आली आहे. या प्रकरणात तिन्ही पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ
पुणे येथे सासर असलेल्या एका विवाहितेला व्यापार करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी पीडितेला मारहाण करण्यात आली. तसेच स्वयंपाक येत नसल्याचे टोमणे मारून उपाशीपोटी ठेवण्यात आले. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
भंगार लाईनमध्ये जुगारावर धाड
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार लाईनमध्ये सुुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. ७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी टाईम बाजार नावाचा मटका सुरू होता. यावेळी पोलिसांनी रोख १२०० रुपये जप्त केले. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.