बिलोली तालुका हा गौणखनिज संपदेने नटलेला असून, तालुक्यात जवळपास ३० रेतीघाट आहेत. या रेतीघाटांचे जिल्हा प्रशासनाकडून लिलाव होत असल्याने विविध बांधकामांसाठी रेतीचा पुरवठा केला जातो. परंतु गतवर्षी कोरोनामुळे तर यंदा घाटांच्या लिलावाची रक्कमही दुप्पट असल्याने रेतीघाट घेण्याकरिता ठेकेदार धजावले नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून, रेतीघाट लिलाव लवकर होईल, या अपेक्षेत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्णतः ठप्प झाले. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तालुक्यातील एका शासकीस रेतीघाटातून घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.
सद्यस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागली असून, येत्या काही दिवसांत बांधकामासाठी पाण्याची समस्या निर्माण होणार, अशी परिस्थिती दिसून येत आहे. तर ज्या नागरिकांना राहण्यासाठी घरे नाहीत, अशा नागरिकांचे पावसाळ्यापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण होणे आवश्यक आहे. यंदा पाऊस भरपूर झाल्याने बिलोली तालुक्यात अनेक नदीपात्रात रेतीघाटांत मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध झाली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून रेतीघाट लिलाव रखडल्याने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेतीअभावी बांधकाम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबींकडे नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे लक्ष देऊन रेती घाट लिलाव करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देतील का? की यंदाही घरकुल लाभार्थ्यांचे बांधकामाच्या आशा धूसर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोट-
बिलोली तालुक्यातील २१ रेतीघाटांची स्थानिक महसूल व जिल्हा पथकांद्वारे पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून, रेतीघाट लिलावाची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर सुरू आहे.
- कैलासचंद्र वाघमारे,
प्रभारी उपविभागीय अधिकारी, बिलोली