शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश

By राजेश निस्ताने | Updated: October 7, 2023 05:45 IST

या मृत्युकांडाला केवळ आरोग्य यंत्रणा जबाबदार नसून हे सरकारचेच अपयश असल्याचे एकूण सोयीसुविधांच्या उपलब्धतेला झालेल्या विलंबावरून दिसून येते.

राजेश निस्ताने

नांदेड : डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या चार दिवसांत पाठोपाठ झालेल्या ५५ रुग्णांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या मृतांमध्ये दोन डझनपेक्षा अधिक नवजात बालकांचा समावेश आहे. या मृत्युकांडानंतर आता आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रुग्णालयाच्या यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात सरसकट उभे करण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु, या मृत्युकांडाला केवळ आरोग्य यंत्रणा जबाबदार नसून हे सरकारचेच अपयश असल्याचे एकूण सोयीसुविधांच्या उपलब्धतेला झालेल्या विलंबावरून दिसून येते.

या शासकीय रूग्णालयात दररोज सरासरी दीड हजारावर रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील किमान शंभरावर उपचारार्थ दाखल केले जातात. अखेरच्या क्षणी व अतिशय क्रिटीकल स्थितीत दाखल झाल्याने त्यापैकी काहींचा मृत्यू होतो. २४ तासांत नेहमीच १४ ते १६ रुग्ण मृत्यू पावल्याची नोंद होते. परंतु, हे मृत्यू केवळ यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अथवा उपचाराअभावी होत नाहीत.  तीन दिवसांपूर्वी २४ तासांत २४ मृत्यू झाल्याने व त्यात अर्ध्याहून अधिक नवजात बालकांचा समावेश असल्याने नांदेडचे शासकीय  रुग्णालय राज्यभर चर्चेत आले. आजघडीला पाच दिवसातील हा आकडा ६६ वर पोहोचला आहे.

हे मृत्यूकांड गाजताच वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते, खासदार, आमदार या शासकीय रुग्णालयात पोहोचले. पुरेसा औषधीसाठा उपलब्ध नसल्याने अधिक संख्येने मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष विरोधी पक्षाने काढला. 

मंत्र्यांचा दौरा ठरतोय ‘खानापूर्ती’

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी पुरेसा औषधीसाठा उपलब्ध असल्याचा दावा पत्रपरिषदेत केला. त्यांची भेट म्हणजे केवळ ‘खानापूर्ती’ असल्याचे   दिसून आले.  या मृत्युकांडाच्या निमित्ताने  काही गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाने औषधी व उपकरणे खरेदीसाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव  ‘डीपीसी’ला दिला होता. मात्र, तो  प्रलंबित आहे.  सारवासारव करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या औषधी भांडारातून ऐनवेळी औषधी आणली गेली. त्यातही सलाइनच्या बॉटलच अधिक होत्या. त्यामुळे पुरेशी औषधी उपलब्ध असल्याचा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा दावा खोटा ठरला आहे. या रुग्णालयालगतच्या तमाम औषध विक्रेत्यांचे रेकॉर्ड तपासल्यास  रुग्णांच्या नातेवाइकांनी वर्षभरात कितीची औषधी खरेदी केली? याचे पुरावे सहज मिळतील.

 ‘अभ्यागत समिती’च नाही

राज्यात भाजपचे सरकार स्थापन होताच सर्व समित्या बरखास्त केल्या गेल्या. त्यात या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत समितीचाही समावेश आहे. केवळ ध्वजारोहणासाठी येथे हजेरी लावणाऱ्या पालकमंत्र्यांना गेल्या वर्षभरापासून ही समिती स्थापन करण्यासाठी सवड मिळालेली नाही. 

रूग्ण व नातेवाईकांना हीन वागणूक

औषधी नाही, रिक्त पदे, अस्वच्छता, यंत्रणेची उद्धट वागणूक, तासनतासाची प्रतीक्षा, बंद व नादुरुस्त उपकरणे, ती असलीच तर ऑपरेटर नसणे, डॉक्टर, परिचारिकांकडून नातेवाइकांचा पाणउतारा करणे आदी सर्व समस्या नियमित आहेत. रूग्ण व नोतेवाईकांना सतत हीन वागणूक दिली जाते. औषधी, उपकरणे, रिक्त पदे भरणे ही जबाबदारी खासदार, आमदार व  ‘सरकार’ची आहे. मात्र, या समस्या पाहता या मृत्युकांडाचे खरे ‘अपयश’ हे सरकारचेच असल्याचे स्पष्ट होते.

खासदारांचाही ‘नहले पे दहला’

खासदारांनी अधिष्ठात्यांना प्रसाधनगृह साफ करायला लावण्याचा प्रकार घडला. लगेच खासदारांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. खासदारांनीही मग आपले वजन वापरून ‘नहले पे दहला’ फेकत अधिष्ठात्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेतला.  मृत्युकांडानंतर नेते मंडळींनी वैद्यकीय महाविद्यालय भेटीचे प्रमुख केंद्र बनविले असले तरी, गेल्या वर्षभरात कोणत्या खासदार, आमदारांनी किती वेळा या महाविद्यालयाला भेटी दिल्या? हे पाहणे महत्वाचे ठरते.

मृतांमध्ये ‘रेफर’ रुग्णच अधिक 

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दरदिवशी १४ ते १६ मृत्यूची नोंद होण्यामागेही काही वेगळी कारणे पुढे आली.  ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयातून सर्रास रुग्ण या वैद्यकीय महाविद्यालयात ‘रेफर’ केले जातात. खासगी दवाखानेही रुग्णाची ‘शारीरिक व आर्थिक क्षमता’ संपत असल्याचे लक्षात येताच अखेरच्या क्षणी या रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा मार्ग दाखवितात. त्यामुळे २४ तासांत १४ ते १६ मृत्यूची नोंद होणे, या रूग्णालयात ‘रुटीन’ ठरते.

शासकीय रुग्णालय की वराहखाना?

‘अस्वच्छता’ हा शासकीय रुग्णालयातील सर्वांत गंभीर विषय आहे. या रुग्णालयाच्या आवारात शेकडोंच्या संख्येने ‘वराह’ फिरत असतात. अगदी वॉर्डांच्या, रुग्णांच्या नातेवाइकांच्या आजूबाजूला वावरताना दिसतात. या वराहांशी सामना करत व घाणीच्या  साम्राज्यातून मार्ग काढत आरोग्य कर्मचाऱ्यांना मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवागाराकडे न्यावा लागतो. 

पूर्ण वेळ अधिष्ठाताच नाही!

गेल्या काही वर्षांपासून या महाविद्यालयाला पूर्ण वेळ अधिष्ठाता नाही. अतिरिक्त प्रभारावर कामकाज चालविले आहे. त्यामुळे अधिष्ठातांना कारवाईबाबत धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. रिक्त पदांच्या आडोशाने जबाबदारी लोटण्याचा प्रयत्न होत असताना उपलब्ध यंत्रणा किती सक्षमतेने काम करते, याचाही आढावा घेणे गरजेचे आहे. विविध विभागांचे ‘एचओडी’ प्रत्यक्ष रुग्णांसाठी किती वेळ देतात, ते स्वत: किती ऑपरेशन करतात, हे तपासणेही तेवढेच गरजेचे आहे. अनेक एचओडी ‘कॅन्टीन’मध्येच असतात, अशी ओरड आहे.

राजकीय अपयश, पण यंत्रणा टार्गेट

राजकीय मंडळीकडून आपले अपयश झाकण्यासाठी आरोग्य यंत्रणेलाच टार्गेट केले जात असल्याने अधिष्ठाताचा ‘प्रभार’ घेण्यास सहजासहजी कोणी तयार होणार नाही, अशी स्थिती आहे. या शासकीय रुग्णालयातील ५५ रुग्णांच्या मृत्यूकांडाचे खरे ‘पाप’ हे राज्य सरकार, वैद्यकीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, आरोग्य सचिव, स्थानिक खासदार-आमदार व जिल्हा तथा आरोग्य प्रशासनाचे असल्याचे स्पष्ट दिसून येते. जनतेने व रुग्णाच्या नातेवाइकांनी या मृत्यूकांडाचा जाब याच सरकार व संबंधित घटकांना विचारणे क्रमप्राप्त ठरते.