नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी १ वाजता जाहीर केला़ नांदेड जिल्ह्याचा ८७़९४ टक्के निकाल लागला असून जिल्ह्यातील ३१ हजार ९९९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत़ गतवर्षीपेक्षा यंदा २. १४ टक्क्याने निकाल उंचावला असून २०१९ मध्ये जिल्ह्याचा ८६़२० टक्के निकाल लागला होता़
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये इयत्ता १२ वी ची परीक्षा घेण्यात आली होती़ प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १७ फेब्रुवारी तर लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत पार पडली होती़ दरम्यानच्या काळात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने २३ मार्चपासून सर्वत्र संचारबंदी जाहीर झाल्याने व ही संचारबंदी पुढे वाढवित गेल्याने यंदा १२ वी परीक्षेचा निकाल विलंबाने जाहीर झाला़जिल्ह्यात विज्ञान शाखेचे १४ हजार ४५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९५़०१ टक्के लागला आहे़ तर कला शाखेच्या १३ हजार १२६ विद्यार्थ्यांनी यंदा उत्तीर्ण होऊन यश मिळविल्याने या शाखेचा निकाल ८०़८४ टक्के लागला आहे़ वाणिज्य शाखेचे ३ हजार ६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेच निकाल ९१़९१ टक्के एवढा लागला आहे़ याबरोबरच एचएससी व्हीडीसी शाखेचे ७२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ७९़१० टक्के लागला आहे़ जिल्ह्यात वरील चारही शाखेचे मिळून ३१ हजार ९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़
यंदा भ्रमणध्वनीवरूनच विद्यार्थ्यांचे कौतुकइयत्ता १२ वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला सुरुवात होते़ यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांकडून पेढे वाटून पाल्याच्या यशाचा आनंद साजरा केला जातो़ मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे़ त्यातच इतर दुकानांसह मिठाईची दुकानेही बंद असल्याने यंदा यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक भ्रमणध्वनीवरूनच करावे लागत आहे़