उमरी ते लोहगाव फाटा या २५१ राज्य महामार्गावरील राहेर ते मुस्तापूर या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, सदर काम कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी करत आहे. सदरील कंपनीचे हायवा, टिप्पर, ट्रक या जड वाहनाने मोठ्या प्रमाणात मुरुम, गिट्टी, डांबरमिश्रित गिट्टीची वाहतूक रात्रंदिवस होत असल्याने व तद्वतच रस्त्याचे काम चालू असल्याने रस्त्याच्या कडेला मुरुमाचे ढीग, गिट्टीचे ढिगारे, जेसीबीने खोदत असलेले रस्ते व या मार्गावरील वाहतूक यामुळे हवेत धुळीचे प्रचंड लोट पसरत आहेत. महामार्गावरील राहेर, तोरणा, दुगाव, कुंभारगाव, बेळकोणी खुर्द, गागलेगाव, इकळीमोर, मुस्तापूर आदी गावांच्या रस्त्यानजीक असलेला तूर, हरभरा, टाळकी, टरबूज, भुईमुग, हळद, पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकांवर धूळ पडून त्या पिकांवर धुळीचे थर जमा झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढीवर व उत्पादनावर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. परतीच्या पावसाने अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला असून, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके वाया गेली आहेत. त्यातच या कंपनीच्या बेजबाबदार कामाने शेतकऱ्यांचे रब्बी मोसमातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.
उपरोक्त गावातील शेतकरी मधुकर हिवराळे, माधव हिवराळे, पाटील पैलवान, विजय नरवाडे, सुरेश हिवराळे, शिवाजी नरवाडे, रावसाहेब नरवाडे, केशव पोपा, यशवंत नरवाडे, व्यंकटराव जाधव, दत्ता कदम, नागोराव कदम, मारोती साळुंखे, गोविंद शिंदे, माधवराव गंभीरे, नामदेव नरवाडे, गजानन दावरशेटीवार, माधव नरवाडे, अवधूत हिवराळे आदींसह या भागातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे व कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडे केली आहे. सदर कंपनी व शासनाकडून न्याय नाही मिळाल्यास तोरणा येथील शेतकरी सक्षम न्यायालयात दाद मागणार आहेत. रस्त्यानजीक राहेर, कुंभारगाव गावातील नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने टँकरने सकाळ, संध्याकाळ रस्त्यावर पाणी टाकण्याची मागणी केली आहे.