नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खिडकी बंद असते. ही खिडकी उघडल्यास आपली बदनामी होईल, आपले खरे स्वरूप जगासमोर येईल, अशी भीती त्याला वाटत असते. त्यामुळेच ही खिडकी कायमची बंद ठेवण्याकडे त्याचा कल असतो. यावरच आधारित ‘खिडक्या’ या नाट्यकृतीतून मानवी स्वभावाचे कंगोरे दाखविण्यात परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमला यश आले.
येथील कुसूम सभागृहात महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू आहे. स्पर्धेच्या नवव्या दिवशी परभणी येथील राजीव गांधी युवा फोरमने संजय पांडे निर्मित ‘खिडक्या’ हे नाटक सादर केले. सर्वार्थाने कलावंतासाठी आव्हानात्मक असलेल्या या नाटकातून अपेक्षित संदेश अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांपर्यंत पोंहचविण्यात हे नाटक यशस्वी ठरले. नाटकातील सुप्रसिद्ध लेखक विश्राम सुत्रावे (गिरीष कराडे) यांचा मृत्यू होतो आणि नाटकाला सुरुवात होते. त्यांच्या वेगवेगळ्या शोकसभातून लोकांना समजलेले महान लेखक म्हणून सुत्रावे दिसतात. मात्र सुत्रावे यांचा मुलगा गुणी (सौरभ कुरुंदकर) हा वडिलांच्या आयुष्यातील एक-एक खिडकी उघडत जातो.
विशेष म्हणजे सुत्रावे यांचा मुलगा नसतो तर लहानपणी आईवर झालेल्या अत्याचारातून आपण जन्मल्याचे तो उघड करतो. आई शारदा (डॉ. अर्चना चिक्षे) ही विश्राम सुत्रावेंची बायको नाही तर बहिण आहे. फक्त अत्याचारातून जन्माला आल्याने मुलाला वडिल मिळाले. आपल्या बहिणीसोबत नात्यात पवित्रता ठेवून जगासमोर ते पती-पत्नीचे नाते दाखवित होते. त्यांच्या या महान त्यागामुळे मनात वडिलांविषयी आदरच निर्माण होतो.
मात्र याचवेळी त्याची आई सुत्रावे यांच्या आयुष्यातील आणखी एक खिडकी उघडते. सुत्रावे हे नपुंसक होते, हे त्यांची विद्यार्थीनी गीता साने (सुनंदा दिगोळकर) यांच्याकडून कळते. स्वत:चे नपुंसकत्व लपविण्यासाठी बहिणीला उपकाराच्या ओझ्याखाली ठेवून आयुष्यभर पिळवणूक करणारा विश्राम सुत्रावे समाजाच्या नजरेत एक प्रतिष्ठीत साहित्यिक असतो. अशा प्रकारे मानवी स्वभावाचे कंगोरे हे नाटक उलगडत जाते.
नाटकातील गिरीष कराडे, डॉ. अर्चना चिक्षे यांनी साकारलेल्या भूमिका लक्ष्यवेधी आहेत तर सौरभ कुरुंदकर, अमित देशपांडे, डॉ. धिरज देशपांडे, सचिन संघई, सुनंदा दिघोळकर, सिद्धार्थ मस्के, तानया लोकरे, आदित्य पांडे, श्रीकांत कुलकर्णी यांनीही आप-आपली भूमिका उत्तम साकारली आहे. नैपथ्य रेवती पांडे आणि सरोज पांडे तर साक्षी घोडेकर यांची प्रकाश योजना आहे. अनुपमा झिंगरे, शोभा पुराणिक यांनी संगीताची तर दिनकर जोशी, अनिल पांडे, अजय डिघोळकर, संतोष चिक्षे यांनी रंगमंचाची व्यवस्था सांभाळली. २७ नोव्हेंबर रोजी बीडच्या नटरंग कलामंदिरातर्फे चंद्रशेखर मुळे लिखित आणि लक्ष्मीकांत दोडके दिग्दर्शीत ‘अल्बम’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.