- शिवराज बिचेवार
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. रविवारी बारा तासांत बारा रुग्णालये फिरूनही खाट न मिळाल्याने दिग्रस (ता. कंधार) येथील नॉन कोविड पेशंट असलेल्या बालाजी चिद्रावार यांना आपला जीव गमवावा लागला.
चिद्रावार यांना उपचारासाठी नातेवाईकांनी रविवारी नांदेडला आणले होते. चिद्रावार यांची कोविड तपासणी करण्यात आली होती. त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. नांदेडमध्ये चांगले उपचार मिळतील या अपेक्षेने नातेवाईक त्यांना घेऊन आले. परंतु प्रत्येक रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याचे सांगत त्यांना नकारघंटा मिळाली.
चिद्रावार यांना घेऊन गेलेल्या नातेवाईकांना सर्वप्रथम देवगिरी, त्यानंतर शिवाजीनगर येथील अश्विनी, शेजारीच असलेल्या भगवती येथे खाटा शिल्लक नसल्याचे ऐकावे लागले. नंतर श्री गुरूगोविंदसिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयातही तेच उत्तर मिळाले. त्यानंतर काब्दे हॉस्पिटल, रेणुकाई, निर्मल, अष्टविनायक, लाईफ केअर असा प्रवास करीत ते शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात पोहोचले. मात्र तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे त्यांना घेऊन नातेवाईकांनी पुन्हा विष्णूपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गाठले.
बारा तासांच्या या वेदनादायी प्रवासात त्यांनी तब्बल बारा रुग्णालयाचे उंबरठे झिजविले. अखेरपर्यंत त्यांना बेड मिळाला नाही. इकडे बालाजीराव यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णवाहिकेतच त्यांना आॅक्सिजन लावण्यात आले. परंतु एकाही डॉक्टरने रुग्णालयाबाहेर येऊन त्यांना तपाले नाही, की त्यांना कुठला वैद्यकीय सल्ला दिला नाही, अशी खंत त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. अखेर रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रुगवाहिकेतच बालाजी चिद्रावार यांनी अखेरचा श्वास सोडला.
पैसे होते; मात्र खाटाच नव्हत्याव्यापारी असलेल्या चिद्रावार यांच्या कुटुंबियांकडे उपचारासाठी आवश्यक तेवढे पैसे होते; परंतु खाट नसल्याचे सांगत कुणीच त्यांना दाखल करून घेतले नाही.
कोविड अन् नॉन कोविड दोन्ही रुग्णांचे हालशहरात खाजगी रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांना दाखल होण्यासाठी अगोदर कोविड नसल्याचे प्रमाणपत्र आणावे लागते. असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रुग्णांना दोन-दोन दिवस वाट पाहावी लागत आहे. दुसरीकडे खाटा उपलब्ध होत नसल्याने प्रमाणपत्र असूनही रुग्णांना उपचाराविना राहावे लागत आहे. कोविड सेंटरमध्ये तर लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनंतरही खाट मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे.
रविवारी नांदेडमध्ये या बारा रुग्णालयांमध्ये बेड उपलब्धच नव्हते का, याची तपासणी ‘लोकमत’च्या टीमने केली. आशा हॉस्पिटल, भगवती कोविड सेंटरमध्ये एकही बेड उपलब्ध नव्हता. अशीच परिस्थिती अश्विनी हॉस्पिटल आणि रमाकांत हार्ट केअर सेंटरमध्ये होती. रविवार या रुग्णालयांत साधे 18 आणि आयसीयूचे 12 असे सर्व बेड फुल्ल होते. भगवती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व 15 बेडस् फुल्ल होते. तीच परिस्थिती आयसीयू बेडची़ उपलब्ध असलेल्या पाचही बेडवर रुग्णांवर उपचार सुरू होते. गोदावरी इन्स्टिटूट ऑफ केअर क्रिटिकल मेडिसिन येथेही हाऊसफुल्लचा बोर्ड होता. नांदेड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये सर्व 34 बेड फुल्ल होते. निर्मल कोविड सेंटरमध्येही 35 बेडवर 35 रुग्ण उपचार घेत होते. समर्पण कोविड सेंटरमध्येही उपलब्ध 50 बेडवर उपचार सुरु होते. श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालयातील 100 बेड फुल्ल होते. तीच परिस्थिती श्री हॉस्पिटल, तिरुमला मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची होती. अष्टविनायक रुग्णालयात बेड शिल्लक असल्याचे दाखविले जात असले तरी तेथेही बेड उपलब्ध नव्हते.
सोमवार दुसरा दिवसही तसाच !दुसऱ्या दिवशी सोमवारी ‘लोकमत’च्या टीमने या बारा रुग्णालयांचा पुन्हा आढावा घेतला. यापैकी फक्त अष्टविनायक रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये १६, तर आयसीयूमध्ये आठ, देवगिरी रुग्णालयात जनरल वॉर्डमधील एकच बेड रिक्त होता. इतर सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल होती.
प्रशासन तत्पर आहे चाचण्या वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढली असून, त्यांना सेवा देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. जिल्हा रुग्णालयातील १७० बेडही रुग्णांसाठी उपलब्ध करून देत आहोत़-डॉ़ विपीन इटणकर, जिल्हाधिकारी