नांदेड : जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे माेठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेकडाे हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे केव्हा हाेणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
६ व ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणाचे दरवाजे उघडले गेले. त्यामुळे नदीकाठावरील अनेक गावांत पाणी शिरले. कित्येक गावांना पाण्याने वेढा घातला. शेतीही खरडून निघाली. शेतातील पिके व मातीही वाहून गेली. कित्येक ठिकाणी थेट खडक उघडे पडले. आधीच कर्ज व नापिकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे हे आणखी माेठे संकट निर्माण झाले आहे.
गेल्या २४ तासांतील पावसामुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यातील मुखेडमध्ये तीन, तर नांदेडमधील एकाचा समावेश आहे. सहा जनावरेही पावसात मृत्युमुखी पडली. १५ घरांची अंशतः पडझड झाल्याची नाेंद घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात घरांचे नुकसान माेठ्या प्रमाणात आहे. मागास वस्त्यांमध्ये व सखल भागांत पावसाचे पाणी शिरले आहे. २४ तासांत काही तालुक्यांमध्ये ५० ते ७० मिमीपर्यंत पाऊस पडला. आपत्ती व्यवस्थापन पथकानेही मदतीसाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनीही प्रत्यक्ष जाऊन पूरस्थितीची पाहणी केली.
हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या
महापालिकेची पाेलखाेलनांदेड शहरात सततच्या पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. नाल्या तुंबल्याने ही स्थिती निर्माण झाली. रेल्वेच्या अनेक पुलांखाली पाणी साचले. काही धार्मिक स्थळेही पाण्याखाली गेली. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची एकूणच पाेलखाेल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आमदार कुटुंबातील दाेघांचे मृतदेह आढळलेमंगळवारी वाहून गेलेल्या मुखेडचे आमदार डाॅ. तुषार राठाेड यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह कारसह बुधवारी नदीपात्रातच सकाळी आढळून आले. यातील एक मृतदेह शेतात आढळून आल्याचे सांगितले जाते. बुधवारी पुलावरून पाणी वाहत असताना कार तेथून पुढे नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही कार पुरात वाहून गेली. यातील चालक देवकते झाडाच्या आश्रयाने वाचला; परंतु भगवान किशन राठाेड (६८) व त्यांचा मुलगा संदीप राठाेड (३८) हे पुराच्या पाण्यात कारसह वाहून गेले हाेते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शाेध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर बुधवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर भगवान यांचा मृतदेह नदीपासून जवळच एका शेतात, तर संदीपचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. मुखेड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. किशन राठाेड हे मुखेडचे आमदार डाॅ. तुषार राठाेड यांचे चुलत बंधू, तर संदीप हा पुतण्या हाेता.