उमरी (जि़नांदेड) : मंगळवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळाने व पावसामुळे शहरातील अनेक घरांचे नुकसान झाले असून अनेक झाडे उन्मळून पडली व विजेचे खांब जमिनीवर कोसळले. उमरी तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
मंगळवारी सायंकाळी शहरात अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाला सुरुवात झाली. या वादळी वाऱ्याचा आवाज भयावह होता. फेरीवाले, फळ गाडीवाले, रस्त्यावरील इतर व्यवसायिक आपापली दुकाने सोडून निवाऱ्याला पळून गेली. अनेकांचे हातगाडे व त्यावरील साहित्य नाहीसे झाले. शहरात अनेक घरांवरील पत्रे उडाली. रात्री उशिरापर्यंत लोक आपल्या घरावरील टीनपत्रे व सामानाचा शोध घेत फिरत होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. घरावरील पत्रे उडाल्याने घरात पाणी घुसले. घरातील सर्व साहित्य चिंब चिंब झाले. त्यामुळे अनेकांनी शेजारील घरामध्ये रात्रभर आसरा घेतला. शहरातील अनेक ज्युस सेंटर जमीनदोस्त झाले. उमरी रेल्वे स्थानकातील छत उडाले. तसेच छताचे पंखे मोडून खाली पडले. उमरी बस स्थानकाचे छतही उडून गेले व या ठिकाणी असलेले पिंपळाचे झाड उन्मळून खाली पडले .
महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात असलेले एक झाड खाली पडले. वाऱ्याचा दाब एवढा मोठा होता की, शहरात अनेक घरावरील पाण्याच्या टाक्या उडून गेल्या. तसेच सोलारचे पॅनल उडून गेले. शहरातील व्यंकटेश नगर , जुना गाव, गणेश नगर भागात महावितरणचे खांब पडल्याने मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागातही तळेगाव व परिसरात विजेचे खांब पडल्याने नुकसान झाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुदैवाने या चक्रीवादळ व पावसामुळे रात्री उशिरापर्यंत कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मंगळवारी रात्रभर उमरी व परिसरातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणचे अभियंता सुनील कासनाळे यांनी दिली.