नांदेड : घर बांधकाम आणि दुचाकी घेण्यासाठी माहेराहून २ लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे घडली. दिसायला चांगली नाहीस असे म्हणून पतीने विवाहितेला मारहाण केली. तसेच घराबाहेर हाकलले. या प्रकरणात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मालेगावात जुगार अड्ड्यावर धाड
नांदेड : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे हॉटेल साईकृपा समोरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. या ठिकाणी कल्याण नावाचा मटका सुरू होता. पोलिसांनी १,२०० रुपये जप्त केले असून, या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दुचाकीवरून होणारी दारूची वाहतूक पकडली
नांदेड : इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोडा नाईक तांडा रस्त्यावरून एम.एच. ४९, के १३७७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून दारूची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ३ हजार २०० रुपयांची दारू आणि २५ हजार रुपयांची दुचाकी जप्त केली. या प्रकरणात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
नांदेड : हदगाव तालुक्यातील वायफना येथे एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली.
मारोती संभाजी हेंबरे असे मयत मजुराचे नाव आहे. अज्ञात कारणावरून मारोती हेंबरे यांनी पंख्याला गळफास घेतला. त्यांना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.