हदगाव : गावपातळीवरील मंत्रालय स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले अन् गावात निवडणुकांचे आखाडे सुरु झाले. या आखाड्यातील महत्त्वाचा वस्ताद मतदार पण एकाच घरातील सदस्य मंडळींना वेगवेगळ्या वार्डात टाकून डाव जिंकण्याचा खेळ करणाऱ्यांच्या अंगलट हा डाव येणार असल्याची चर्चा गावात रंगली असून शेकडो आक्षेप तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे नोंदविण्यात आले आहेत.
प्रारुप याद्या जाहीर करण्यापूर्वी त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी तलाठ्याने प्रत्येक गावात सांगितले. याद्या पाहिल्यानंतर इच्छुक उमेदवार बेजार झाले कारण स्वत:चे मतदान वार्ड क्रमांक एकमध्ये तर पत्नीचे तीनमध्ये व आई वडिलांचे पाच क्रमांकाच्या वार्डात त्यामुळे गयास कादरी यांनी तहसील कार्यालयात आक्षेप नोंदविला आहे. सन २०१५ च्या याद्या ऑनलाईन काढून काही मंडळीने आपल्याला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचे चक्क नावेच दुसऱ्या वार्डात टाकून आपला मार्ग सुकर केला खरे. तर याद्या बनविण्याचे काम तलाठी यांचे पण ते म्हणतात, शिक्षकांनी नवीन मतदारांची नावे नोंदवली ऑनलाईन पण त्यांचे सोबत वडिलांच्या मतदान कार्डाची झेराॅक्स पुरावा म्हणून जोडण्यात येते. तलाठी व त्यांचे हाताखाली काम करणाऱ्या मंडळीने हा अवचटपणा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खरे खोटे तपासणीत पुढे येईलच पण पत्नीचे किंवा घरातील मंडळीचेच आपल्या पाठीशी मतदान नसल्याने उभे राहण्याची हिंमत कोण करेल.
कोट
लोकांनी लोकांसाठी गावगाडा चालविण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. पण कूटनितीज्ञ असे प्रकार करुन लोकशाहीचा गळा घोटत असतील तर अवघड आहे. मनाठा, सावरगाव, तामसा, बरडशेवाळा, करमोडी, आष्टी प्रत्येक गावातून आक्षेप येत आहेत. १५ डिसेंबरपर्यंत आक्षेप करता येतील. २५ डिसेंबरला अंतिम याद्या प्रकाशित करण्यात येणार आहेत. तलाठ्यांना नोटीस काढू.
- जी.ए.हराळे, नायब तहसीलदार, निवडणूक विभाग हदगाव