- संजय दमकोंडवार मुक्रमाबाद (जि. नांदेड) : घरासमोर बाजेवर बसलेल्या पूतण्यावर चाकुचे वार करून त्याचा खून केल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता मूखेड तालुक्यातील भोजू तांडा आनंदगाववाडी येथे घडली. विनोद रमेश राठोड (२०) असे मयत पुतण्याचे नाव आहे.
या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी विनोद हा मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाची परीक्षा देऊन घरी आला होता. घरासमोर टाकलेल्या भाज्यावर तो झोपला. सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपी धोंडीबा राठोड हातात मिरचीची पूड आणि चाकू घेऊन घराजवळ आला. त्या ठिकाणी घरापुढे भांडण झाले. या भांडणातूनच पुतण्या विनोद राठोड याच्या पोटात चाकूचे वार केले. मयत विनोद याचे भाऊ व आई, वडील यांनी आरोपीला 'तुझ्या पाया पडतो, पण माझ्या मुलाला मारू नकोस', अशा विनवण्या केल्या. तरीही या विनवण्याला न जुमानता आई-वडिलांसमक्ष आरोपी धोंडिबा राठोड यांनी चाकूचे वार केले. दरम्यान, जखमी विनोद याला दवाखान्यात दाखल करीत असताना त्याची प्राणज्योत मालवली. घटनेनंतर आरोपी धोंडीबा त्या ठिकाणावरून पळून गेला. मयत विनोद याच्या पाशात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
याप्रकरणी रमेश गोविंदराव राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धोंडीबा देवला राठोड, पिंटू उर्फ अंकुश राठोड, काशाबाई धोंडीबा राठोड, कल्पना धोंडीबा राठोड यांच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन कांगणे, दिलीप तग्याळकर तपास करीत आहेत.
चारही आरोपींना अटकघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास गोजेगाव येथून आरोपी धोंडीबा राठोड याला तर इतर ३ आरोपींना गावातून अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक गजानन कांगणे यांनी दिली.