नांदेड, दि. 16 - महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तीर्थक्षेत्र नवरात्र महोत्सवासाठी सज्ज होत आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल अमलीवन म्हणून प्रसिद्ध होते. प्राचीन किल्ल्याचे ठिकाण असलेल्या याच माहूरगडावर २१ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होत आहे.माहूरगडावर रेणुकादेवीबरोबरच दत्तात्रय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे आहेत. नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर असलेला हा माहूरगड चोहोबाजूंनी डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. देवीचे मंदिर तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची मंदिरेसुद्धा माहूरगड या नावानेच ओळखल्या जाणाºया टेकडीच्या माथ्यावर असून पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या गावाशी जोडली गेलेली आहेत. रेणुकामातेला श्री परशुरामाची माता म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे हे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधल्याचे सांगितले जाते. याच माहूरगडावर श्री दत्तात्रयांचा जन्म झाला, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. दत्तात्रयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलावर एका शिखरावर आहे. गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगण्यात येते. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुनर्बांधणी १५४६ मध्ये झाली होती. त्याची खूण मुख्य दरवाजावर बसविण्यात आली आहे. या मंदिराचा विस्तार साडेतीनशे वर्षांपूर्वी शालीवाहन राजाने इ. स. १६२४ च्या सुमारास केल्याचे सांगितले जाते. हे मंदिर वास्तूशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले असून गाभारा व सभामंडप अशा दोन भागांत विभागले आहे. गाभाºयात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या गाभाºयाचा प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यांनी मडविला आहे. देवीचा मुखवटा पाच फूट उंचीचा असून त्याची रुंदी चार फूट आहे.चांदीने मडविलेल्या दक्षिणाभिमुख प्रवेशद्वारातून भाविक प्रत्यक्ष रेणुकामातेच्या मंदिरात प्रवेश करतात. या मंदिराशिवाय परिसरात कोल्हापूरची महालक्ष्मी देवी व तुळजापूरच्या तुकाईदेवीचेही मंदिर आहे. महाराष्टÑातील अनेक परिवारांचे कुलदैवत असलेल्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी महाराष्टÑासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने नवरात्रोत्सव काळात माहूरगडावर दर्शनासाठी येतात.यावेळी ‘मला रेणुकाई दे दर्शनाशी, गडा चढूनीया आले माहेराशी, तुझे मंगलकारी रुप भक्ताशी नमस्कार माझा आई रेणुकेशी’ काहींशी अशीच भावना भाविकांची असते.
मला रेणुकाई दे दर्शनाशी, गडा चढूनीया आले माहेराशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 7:35 PM