नांदेड : जन आशीर्वाद यात्रे दरम्यान परळी येथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहीत, मी आशा कोणत्याही घोषणा ऐकल्या नाही, असे म्हणत केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड ( Bhgwat Karad ) यांनी सोमवारी घडलेल्या त्या घटनेवर पांघरूण घातले.
डॉ. कराड हे मंगळवारी नांदेडमध्ये आले होते. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला ( BJP JanAshirwad Yatra ) सोमवारी परळी येथून सुरवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भागवत कराड यांच्या उपस्थितीत मुंडे समर्थकांनी, 'पंकजाताई अंगार है बाकी सब भंगार है' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. या प्रकाराबद्दल कराड यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगितले, तसेच मी कोणत्याही घोषणा ऐकल्याच नाहीत. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत असे म्हणून त्यांनी झालेल्या प्रकारावर पांघरूण घातले.
परळीत काय घडले होते जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवाती पूर्वी भागवत कराड हे पंकजा मुंडेंच्या परळी येथील घरी आले होते. यावेळी पंकजा यांच्या घराबाहेर मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है...', अशा स्वरुपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. यानंतर भागवत कराड यांच्यासमोरच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहे का? इथे काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का? हे वागणं मला चालणार नाही, असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, अशा शब्दात पंकजा यांनी कार्यकर्त्यांना झापलं.