नांदेड : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात़ परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे़ अद्यापपर्यंत तरी वंचित आघाडीसाठी आमच्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही़ अॅड़ आंबेडकरांनी तसा प्रस्ताव दिल्यास आघाडीसाठी विचार करू, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा़जोगेंद्र कवाडे यांनी केले़ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू असून दोन जागांची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले़
नांदेड येथे मंगळवारी कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली़ यावेळी ते बोलत होते़ राज्यात पडत्या काळात आम्ही काँग्रेसची साथ दिली़ आमच्या सोबतीमुळेच नांदेड महानगरपालिकेतही काँग्रेसला बहुमत मिळाले़ त्यामुळे काँग्रेसने स्वीकृत सदस्यांच्या पाच जागेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीला एक जागा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली़ दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकारवर प्रा.क़वाडे यांनी यावेळी जोरदार टीका केली़ देशात संविधानिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे़ आमच्या कलेनेच वागले पाहिजे असा दबाव निर्माण केला जात आहे़ त्यामुळे देशातील एकसंघतेला धोका निर्माण झाला आहे़ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात महाआघाडी केली जात आहे़ असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बापुराव गजभारे, गणेश उनवणे, शशीभाई उनवणे, विनोद भरणे, कुलदीप चिकाटे आदींची उपस्थिती होती़
ईव्हीएम मशीनवर शंका कायम ईव्हीएमद्वारे मतदान ही प्रणाली अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राने बंद केली आहे़ ईव्हीएमवर नागरिक शंका घेत असतील तर ती निवडणूक आयोगाने बंद करावी व पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणीही यावेळी कवाडे यांनी केली़ ईव्हीएम हॅक करता येते की नाही हा प्रश्न संशोधनाचा असला तरी या मशीनवरील शंका मात्र कायम आहे़ ईव्हीएम बंद करण्याच्या मागणीसाठी आम्हीही मोर्चे काढले आहेत़ गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करावी असेही ते म्हणाले़
पहा व्हिडिओ :