बुधवारी शहरातील कुसुम सभागृहात डॉ. शंकरराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित परिसंवाद व मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण तर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संपादक राजीव खांडेकर, सत्कारमूर्ती माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. किशनराव राठोड, माजी आ. केशवराव औताडे, ‘टोकाई’चे माजी अध्यक्ष शंकरराव खराटे, पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे, उद्योजक अनंत घारड, काँग्रेस प्रवक्ता तथा संपादक संतोष पांडागळे, संचालक संदीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जलसंपदामंत्री म्हणून काम करत असताना शंकरराव चव्हाण यांनी राज्यात विविध धरणांची उभारणी केली. त्यामुळे मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र वाढू शकले. आज त्यांच्याच दूरदृष्टीने मराठवाड्यासह अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी १८ मोठी धरणे उभारली तर १६ धरणांची तरतूद केली. १२ हजार मेगावॅट विजेची निर्मिती झाली. जायकवाडी धरणाच्या विरोधात तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी २२ आक्षेप नोंदविले होते. त्या वेळी पाटबंधारेमंत्री असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी जल आयोगासमोर समर्पक उत्तरे देऊन आक्षेप खोडून काढले. त्यामुळेच आज जायकवाडी उभे राहिले. काश्मीर, पंजाब, तामिळनाडू व ईशान्य भागात फुटीरतावादामुळे अशांतता पसरली होती. त्या वेळी धाडसी निर्णय घेत त्यांनी या भागात शांतता प्रस्थापित करण्याचे काम त्यांनी केले.
ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी शंकरराव चव्हाण यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच सत्कारमूर्ती माजी मंत्री भास्करराव पाटील यांनी शंकरराव चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनोहर आयलाने यांनी मानले.