- श्रीनिवास भोसले
नांदेड : प्राध्यापक भरती बंद असल्याने जवळपास साडेतीन हजार सेट, नेट उत्तीर्ण, पीएच़ डी़ पात्रताधारक नोकरीच्या शोधात असून अनेकांना वर्षानुवर्षे सीएचबी (तासिका तत्वावर) नोकरी करावी लागत आहे़ स्वारातीम विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ९७ महाविद्यालयात एकूण १३०० प्राध्यापक तासिका तत्वावर कार्यरत आहेत़
शासन शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहे़ परंतु, उच्च शिक्षण घेवूनही नोकरी मिळत नसल्याने सेट, नेट, पीएच़डी धारकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे़ नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक पात्रताधारक एकत्र येवून प्राध्यापक भरतीसाठी लढा देत आहेत़ त्यातील बहुतांश जण तुटपुंज्या वेतनावर ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात जवळपास जवळपास २९८ जागा रिक्त आहेत़ तर आजघडीला १३०० प्राध्यापक हे तासिकातत्वावर कार्यरत आहे़ परंतु, उर्वरित हजारो पात्रताधारक हे आजही घरीच आहे़ शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका उच्चशिक्षीतांना बसत आहे़ एका तासाला २४० रूपये याप्रमाणे वेतन काढले जाते़ तुटपुंज्या वेतनामुळे ज्ञानार्जनावर परिणाम होतो़
दरम्यान, वर्षातून दोन वेळा नेट तसेच सेटची परीक्षा घेतली जाते़ प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद आहे़ परंतु, पात्रतेसाठी लागणारी परीक्षा वर्षातून पाचवेळा घेतली जाते़ त्यामुळे प्राध्यापक पात्रताधारकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ वर्षानुवर्षे तासिका तत्वावर नोकरी करणाऱ्या अनेकांची लग्न जुळत नाहीत, नोकरीअभावी काही जण मनोरूग्ण झाले तर काही जण शिक्षण क्षेत्र सोडून मिळेल ते काम करीत असल्याचे सांगत, शासनाने सेट, नेट परीक्षा बंद करावी, असे मत प्रा़डॉ़बालाजी आव्हाड यांनी व्यकञ! केले. सेट, नेट उत्तीर्ण व पीएच़डी़धारकांमध्ये भाषा विषय, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र आदी विषयांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे त्यांना आयटी, बँकीग क्षेत्रातही नौकरी मिळत नाही. दूसरीकडे उच्चशिक्षण घेतल्यामुळे शेतात काम करू शकत नसल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक डॉ़परमेश्वर पौळ यांनी दिली़
सालगड्याला मिळतात जास्त पैसे महाराष्ट्रात ९ हजार ५११ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत़ शासन जागा भरण्यास तयार नाही़ एवढे शिक्षण घेवून तासिका तत्वावर नोकरी करावी लागते़ शासन वर्षाला केवळ ४०,००० पगार देते़ आमच्यापेक्षा शेतातील सालगड्याला जास्त पैसे मिळतात़ वयस्कर आई वडिलांजवळ राहण्यासाठी एमएनसीमधील मोठी नोकरी सोडून आलो़ पण इथे आल्यानंतर समजले की आपण परदेशात काम केले तर लाखो रूपये मिळतात़ परंतु, आज तुटपुंज्या वेतनावर काम करण्याची वेळ आली आहे. अशी प्रतिक्रिया अर्धापूर येथील प्रा.डॉ.परमेश्वर पौळ यांनी व्यक्त केली.
डोनेशनअभावी नोकरी अन् लग्न नाहीपात्रता पुर्ण केल्यानंतरही मागील १२ वर्षापासून कायमस्वरूपी नौकरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षण घ्यायचे कशासाठी असा प्रश्न डॉ़ प्रणिता माधवराव वांगे यांनी उपस्थित केला. शासन नौकर भरती करीत नाही. काही जागा निघतात मात्र भरमसाठ डोनेशनच्या मागणीमुळे पात्रता असतानाही नौकरीपासून वंचित रहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणुन लग्न नाही आणि डोनेशन नाही म्हणून नौकरी नाही. अशी अनेकांची परिस्थिती असल्याचे सांगत, देशातील शिक्षणव्यवस्था बदलण्याची वेळ आल्याचे डॉ़ प्रणिता वांगे यांनी सांगितले.