नांदेड : येथील माता गुजरीजी विसावा उद्यानातील शौचालय आणि स्वच्छतागृहातील घाणीने मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ७ ते ८ जणांना इन्फेक्शन झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. त्यामुळे आरोग्य सुदृढ करण्यासाठी जाणारे नागरिक रोगराई तर घेऊन येत नाहीत ना, अशी भीती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासन मात्र या प्रकारावर गप्प आहे.
नांदेड शहरात माता गुरुजी विसावा उद्यान एकमेव उद्यान आहे. मुले, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी दररोज आनंद घेण्यासाठी येतात. स्वच्छ हवा मिळावी आणि आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी मॉर्निंग वॉक करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिकही येथे येतात. उद्यानातील शौचालय आणि स्वच्छतागृहाचे मात्र हाल झाले आहेत. प्रचंड दुर्गंधी, घाण पसरली असून, या स्वच्छतागृहात जाणे तर सोडाच परिसरात थांबणेही अशक्य झाले आहे. स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीमुळे ७ ते ८ जणांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक माहिती येथे येणाऱ्या नागरिकांनी दिली. सध्या हे नागरिक उपचार घेत आहेत. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रोगराईच घेऊन जावी लागत आहे.
स्वच्छतागृहात पाण्याचा अभावयेथील स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे दररोज घाणीत वाढ होत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक महिन्यांपासून स्वच्छता केली नसल्याने स्वच्छतागृहच फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याचे ठरू लागले आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.