नांदेड : शहर पोलिस उपाधीक्षकपदी नव्याने आलेल्या सूरज गुरव यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच त्यांनी शहरातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांना पाचारण करून त्यांची चांगलीच हजेरी घेतली. कायद्यात राहाल तर फायद्यात, असा सज्जड इशाराही यावेळी गुरव यांनी दिला. त्यामुळे पहिल्याच दिवशी गुन्हेगारांनी नव्याने आलेल्या अधिकाऱ्याची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून आले.
नांदेड शहरचे उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख यांची देगलूर उपविभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागी सूरज गुरव हे आले आहेत. डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून गुरव यांची ओळख आहे. नांदेडात आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी आपली खमक्या स्टाइल दाखविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी उपविभागातील सर्व पोलिस ठाणे प्रमुखांची बैठक घेऊन माहिती घेतली. त्यानंतर बुधवारी शहरातील रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना उपाधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. त्यात खून, चोरी, जबरी चोरी, मटका, जुगार अड्डे चालविणाऱ्या गुन्हेगारांचा समावेश होता. प्रत्येकाची वैयक्तिक माहिती आणि त्याने आजपर्यंत केलेले गुन्हे याबाबत इत्यंभूत माहिती घेऊन त्यांना यापुढे कायद्यात राहण्याचा इशारा दिला, तर अट्टल गुन्हेगारांना त्यांनी पोलिसी भाषेत समज दिली. ठाणे प्रमुखांनाही कामात हयगय आणि निष्काळजीपणा चालणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे नव्याने आलेल्या उपाधीक्षक गुरव यांची गुन्हेगारांनी धास्ती घेतल्याचे दिसून आले.