जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत जाहीर केलेल्या निर्बंधांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवस दररोज २०० रुग्ण सापडले आहेत. परिस्थिती भयभीत होण्यासारखी नाही; मात्र इशारा देणारी व काळजी घेण्याची गरज अधोरेखित करणारी आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध नागरिकांच्या सुरक्षेसाठीच आहेत. परिस्थिती चिघळली तर किती गंभीर वेळ येते, हे आपण यापूर्वी अनुभवले आहे. त्यामुळे पुन्हा तशी वेळ येऊ नये, हीच प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.
जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांमुळे नागरिकांच्या दिनचर्येवर विशेष परिणाम होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुकाने सुरळीतच राहणार आहेत. केवळ वेळेची मर्यादा घालून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली तर मग कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देतानाच मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश ध्यानात ठेवून सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित रहावे, असेही पालकमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.