गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन
नांदेड - भाजपा वर्धापन दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. ॲड. दिलीपसिंघ ठाकूर यांनी ही पाणपोई सुरू केली. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, सरचिटणीस गंगाधर जोशी, माधव साठे, माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, संयोजक राज यादव, रामाजी सरोदे, रुपेंदरसिंघ शाहू आदी उपस्थित होते.
१७ एप्रिलपासून श्रामनेर प्रशिक्षण शिबिर
नांदेड - ऋषीपठण बहुउद्देशीन सेवाभावी संचलित श्रामनेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्र खुरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार आहे. या निमित्ताने १७ एप्रिलपासून विशेष श्रामनेर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती संचालक पय्याबोधी थेरो यांनी दिली. यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकअदालत रद्द
किनवट - किनवट न्यायालयाच्या प्रांगणात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालत रद्द करण्यात आल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. जहागीर पठाण यांनी दिली. या संदर्भात विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे पत्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे सचिव आर. एस. रोटे यांचे पत्र प्राप्त झाले. सर्व पक्षकारांनी व वकिलांनी नोंद घ्यावी असेही पठाण म्हणाले.
कोरोनाचे रुग्ण वाढले
हदगाव - तालुक्यातील बरडशेवाळा येथे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. येत्या काही दिवसात कोरोना शतक पूर्ण करेल असे चिन्ह आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ज्या त्वरेने शासकीय यंत्रणा कामाला लागली होती, दुसऱ्या टप्प्यात मात्र तसे काही दिसून न आल्याने कोरोना रुग्णात मोठी वाढ झाली आहे.
वाळूअभावी घरकुलांची कामे ठप्प
नायगाव - तालुक्यातील घरकूल योजनेच्या कामांना गती देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असताना नायगाव तालुक्यातील अनेक गावात वाळूअभावी घरकुलांची कामे रखडली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, इंदिरा आवास योजना आदी योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाली. मात्र वाळूअभावी कामे रखडली आहेत. लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचे आदेश असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भोसीकर यांच्या विजयाचा जल्लोष
धर्माबाद - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत हरीहरराव भोसीकर निवडून आले. त्यांच्या विजयाचा जल्लोष धर्माबाद येथे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र पाटील, मोहसीन खान, रवींद्र शेट्टी, पंडित पाटील, भोजाराम गोणारकर, सुधाकर जाधव, नगरसेवक आबेद अली, माजी नगरसेवक मतीनभाई, सय्यद सुलताना बेगम, किरण गजभारे, बाबूराव गोणारकर आदी उपस्थित होते.
धर्माबादेत गटारी तुंबल्या
धर्माबाद - शहरातील साफसफाईचे काम ठप्प झाले आहे. गटारीही तुंबल्या आहेत. पालिकेत जबाबदार अधिकारी नसल्यामुळे शहराची अवस्था बिकट बनली असा आरोप शिवसेनेने केला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर बंद असल्याने शहरातील स्वच्छतेचे तीनतेरा झाले. घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारींची साफसफाई नाही. यातून नाल्या तुंबून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती
माहूर - येथील ग्रामीण रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. विद्यमान वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकटेश भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉ. विजयकुमार मोरे रजेवर असल्याने एकूणच कारभार रखडला होता. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी डॉ. मोहन अकोले व डॉ. राजकुमार बोडके यांची माहुरात नियुक्ती केली आहे.
कुंटूरकर यांना श्रद्धांजली
नांदेड - माजी खा. गंगाधरराव कुंटूरकर यांना नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, वसंत सुगावे, जीवन पाटील, संतोष दगडगावकर, श्रीकांत मांजरमकर, बाळासाहेब भोसीकर, रेखा राहेरे आदी उपस्थित होते.
ममदापूर येथे लसीकरण
बिलोली - तालुक्यातील ममदापूर येथे ४ एप्रिल रोजी ४५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. रुबिया पठाण, एल. डी. साठे, सी. के. करंडे, राहुल पाटील, शंकर पाटील, शिवा पाटील, बाबू पाटील, कैलास पाटील, संगमनाथ पाटील, शशिकला शिवशेटे, ललिता शिंदे आदी उपस्थित होते.
८० लाखांचा निधी
भोकर - तालुक्यातील हाडोळी येथील आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीसाठी ८० लाखांचा निधी उपलब्ध झाला. याकामी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लक्ष घातले हाेते. या उपकेंद्रासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माजी सरपंच माधवराव अमृतवार यांनी केली हाेती. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमार्फत आदिवासी उपाययोजना अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे.