गुरुवारी सकाळी नायब तहसीलदार महसूल मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांना मुगट येथे गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणारे सक्शन मशीन (वाळू उपसा करणारी बोट) चालू असून काल रात्रीपासून उपसा चालू असल्याची माहिती मिळाली.
सदरील महिती त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली असता त्यांनी सदर बोट नष्ट करण्याचे आदेश दिले.
तदनंतर नांदेड व मुदखेड तहसीलचे संयुक्त पथक जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार किरण अंबेकर व तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार मुगाजी काकडे व नायब तहसीलदार संजय नागमवाड यांच्या नेतृत्वाखाली नांदेड व मुदखेड तहसीलचे पथक मौजे मुगट येथे गुरुवारी सकाळी १० वाजता पोहोचले. या ठिकाणी त्यांनी परवाना धारक जिलेटिन वापर करणाऱ्या व्यक्तीस बोलावून घेऊन स्फोट करवून बोट आहे त्या ठिकाणीच नष्ट करण्यात आली आहे.
या कारवाईत मंडळ अधिकारी खुशाल घुगे, चंद्रशेखर सहारे, बालाजी कुऱ्हाडे तलाठी ईश्वर मंडगीलवार, आकाश कांबळे, राहुल चव्हाण, संजय खेडकर, प्रवीण होंडे, विकास गलांडे, अपर्णा देशपांडे व कोतवाल भांगे यानी सहभाग घेतला.
महसूल प्रशासन जरी कोरोनाच्या कामात व्यस्त असले तरी अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार किरण अंबेकर व दिनेश झांपले यांनी सांगितले.