"मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार..."; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ
By शिवराज बिचेवार | Published: July 27, 2024 06:16 PM2024-07-27T18:16:18+5:302024-07-27T18:18:39+5:30
आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू.
नांदेड: विधानसभा निवडणुकीत क्रॉसवोटींग केल्याचा आरोप असलेले आमदार जितेश अंतापूरकर यांची गेल्या काही दिवसात भाजपाशी जवळीक वाढली आहे. परंतु त्याबाबत उघडपणे त्यांनी आपली भूमिका जाहिर केली नव्हती. शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर सभागृहाबाहेर माध्यमांची प्रतिनिधी दिसताच त्यांनी आपल्या वाहनाच्या दिशेने पळ काढला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अखेर गाठलेच. यावेळी मी काँग्रेसमध्येच असून चर्चा काय व्हायच्या ते होवू द्या. यावर योग्यवेळी सविस्तर बोलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारात आमदार जितेश अंतापूरकर हे अखेरपर्यंत उतरलेच नव्हते. जिल्हाध्यक्षांनी भेट घेतल्यानंतरही त्यांनी प्रचारापासून अंग काढून घेतले. त्यावेळी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे पाठविला होता. परंतु त्यावेळी कारवाई झाली नाही. त्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉसवोटींग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यात आमदार जितेश अंतापूरकर यांचे नाव आघाडीवर होते. जिल्हा काँग्रेस कमिटीनेही पुन्हा अंतापूरकर यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही निलंबानाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु कारवाईचा चेंडू दिल्लीत गेल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात गेले.
याच दरम्यान आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाचे नेते संजय उपाध्याय आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्याला कारणही तसेच होते. कारण क्रॉस वोटींग केलेल्या आमदारावर काँग्रेसने कारवाई केल्यास महायुती त्यांचे पुर्नवसन करेल असा शब्द देण्यात आला होता. परंतु या सर्व घडामोडींवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी मात्र माध्यमांसमोर येत आपली भूमिका जाहिर केली नव्हती. शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते उशिरानेच सभागृहात दाखल झाले. बैठक आटोपताच सभागृहाबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधी आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून अंतापूरकर यांनी पळ काढला. बराच अंतर पळाल्यानंतर ते वाहनात बसले अन् पत्रकारांनी त्यांना गाठलेच. यावेळी आरोप हे होत असतातच. माझ्यावरती झालेल्या आरोपावर मी सविस्तर बोलणार आहे. क्रॉस वोटींगच्या आरोपाबाबत पुराव्यानिशी बोलणार असल्याचेही सांगत त्यांनी काढता पाय घेतला.
अशोकराव चव्हाणांशी विकासकामांवर चर्चा
अंतापूरकर यांना खासदार अशोकराव चव्हाणांच्या भेटी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, अशोकराव चव्हाण हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते राज्याचे नेते आहेत. त्यांची भेट ही विकास कामांसाठी घेतली होती. त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. मी काँग्रेसमध्येच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.