नांदेड- नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शहरातील बाफना उड्डाणपुलावर काल रात्री घडली. यात महिलेच्या दंडाला गोळी लागली असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. आर्थिक देवाण घेवाणीतून हा हल्ला करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सविता गायकवाड असे या महिलेचे नाव आहे. सोमवारी रात्री अकरा वाजता त्या आपल्या मोपेडवरुन मगनपुरा येथून आपल्या घरी जात होत्या. उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . दरम्यान आरोपी कोण होते. त्यांनी हल्ला का केला याचा तपास सुरू आहे. दोन हल्लेखोरांची ओळख पटली असल्याची माहिती आहे.