नांदेड : अतिवृष्टी, गारपीटीतून अजूनही शेतकरी सावरला नसून, जिल्ह्यात प्रत्येक तीन दिवसांना एका शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे. हा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत असताना शासन- प्रशासनाला मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने चीड निर्माण होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टीन खरीप हंगाम धुवून गेला. वर्षभराच्या उत्पन्नावर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला, मुलांचे शिक्षण, लग्न, वडिलधाऱ्यांचा दवाखाना असे सगळेच आर्थिक गणिते बिघडल्याने खिन्न झालेल्या शेतकऱ्यांनी मरण पत्करले. पण शासन काही लक्ष द्यायला तयार नाही. मागच्या वर्षभरात ११२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्या थांबतील, असे वाटले होते. मात्र, यावेळेसही असेच चित्र आहे.
तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नव्या वर्षात देखील शेतकरी कष्ट आणि संकटाचा धनी बनला आहे. दररोज जिल्ह्यात या घटना घडत असताना शासन स्तरावर मात्र या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणखी जटील बनत आहेत.
१०० दिवसांत ३५ जणांनी मृत्यूला कवटाळलेजानेवारी ते १० एप्रिल या १०० दिवसामध्ये जिल्ह्यात ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पीक विमा, शासनाची मदत यातून फार काही हाती लागले नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मार्चमध्ये सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मार्च महिन्यात सर्वाधिक १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात ९, फेब्रुवारीमध्ये ८ आणि १० एप्रिलपर्यंत ४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
११२ कुटुंबियांना मिळाली मदतमागील वर्षात १४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले. या कुटुंबाला सावरण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसाला शासनाकडून १ लाख रुपयांची मदत दिली जाते. मागील वर्षातील १४७ पैकी केवळ ११२ शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे.
कोणत्या महिन्यात किती आत्महत्या?जानेवारी : ९फेब्रुवारी : ८मार्च : १४१० एप्रिलपर्यंत : ४