नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, भाजपासोबत वंचित मैदानात; ‘एमआयएम’ची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:27 PM2024-10-30T12:27:36+5:302024-10-30T12:30:28+5:30
वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच्या उमेदवाराला म्हणजेच अविनाश भोसीकर यांना पुन्हा संधी दिली आहे.
नांदेड : नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी विधानसभा निवडणुकांबरोबरच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप, अशी लढत होणार आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिला आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले होते. त्यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत विजय संपादन केला होता; परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून चार जणांचे नाव चर्चेत होते. परंतु शेवटच्या टप्प्यात हंबर्डे यांच्या गळ्यात उमेदवारी टाकण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच्या उमेदवाराला म्हणजेच अविनाश भोसीकर यांना पुन्हा संधी दिली आहे. लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बेरजेचे राजकारण करत सहा ठिकाणीदेखील काँग्रेसचाच उमेदवार दिला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा उमेदवारांना एकाच चिन्हासाठी मत मागणे सोपे जाईल, असे त्यामागचे समीकरण आहे.
‘एमआयएम’ची माघार
‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा खुद्द जलील यांनी केली होती. परंतु त्यांनी ना उमेदवारी अर्ज विकत घेतला ना उमेदवारी दाखल केली. त्यामुळे ‘एमआयएम’ने अचानक घेतलेली माघार चर्चेचा विषय ठरत आहे.