नांदेड : इपीएस ९५ सेवानिवृत्तीधारकांना किमान साडेसात हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता द्यावा, या प्रमुख मागणीसाठी शहरातील बाफना टी पॉइंट येथे १५ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करून आपल्या भावना सरकारसमोर मांडल्या. आंदोलनामुळे या भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
एस. टी. महामंडळ, वीज वितरण कंपनी, सहकारी बँका, साखर उद्योग, विनानुदानित शाळा, महाविद्यालये, वस्त्र उद्योग महामंडळ अशा सुमारे १८६ उद्योगात काम केलेल्या इपीएस ९५ सेवानिवृत्तीधारकांना दरमहा सरासरी ११७१ रुपये इतके सेवानिवृत्ती वेतन दिले जाते. उमेदीच्या काळात पगारातून शासनाकडे अंशदान जमा केले असताना तूटपुंजे सेवानिवृत्ती वेतन का दिले जात आहे? असा सवाल या सेवानिवृत्तीधारकांनी उपस्थित केला आहे. जीवन जगण्यासाठी किमान ७,५०० रूपये सेवानिवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता द्यावा, १ नोव्हेंबर २०१४ पूर्वीच्या तसेच नंतरच्या पेन्शनधारकांना समान सेवानिवृत्ती वेतन द्यावे, मोफत वैद्यकीय सेवा मिळाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे प्रांताध्यक्ष स. ना. आंबेकर, डॉ. हंसराज वैद्य, बी. आर. बनसोडे, शंकरराव लोकरे, दिगंबर पावडे, गणेशराव मस्के, जी. एल्लया, विवेक चौधरी, विश्वनाथ शिंदे आदींनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता रास्ता रोकोला प्रारंभ झाला. या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यातील सुमारे २ हजार सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.