नांदेड- फवारणीचे औषध खरेदी करण्यासाठी नांदेडमध्ये आलेल्या एका शेतकऱ्याची 24 हजार रुपये असलेली पिशवी घेऊन पळ काढणाऱ्या आरोपीला मनसेचे जिल्हाप्रमुख मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी पाठलाग करून फिल्मी स्टाईल पकडून चोप दिला.
पूर्णा तालुक्यातील हरगल येथील शिवाजी सोनटक्के हे फवारणीचे औषध खरेदी करण्यासाठी गुरुवारी नांदेडला आले होते. श्री गुरू गोविंदसिंगजी शासकीय रुग्णालया समोरून ते मोंढा कडे पायी जात होते. यावेळी साधारणपणे आठ वर्षाचा मुलगा त्यांच्या जवळ आला. मामा तुम्ही खेड्यातील दिसत आहात, आमचे शेठजी गरिबांना कपडे आणि पैसे वाटप करीत आहेत असे म्हणून त्यांना रुग्णालयाच्या जुन्या इमारत परिसरात नेले. फोन करून त्या मुलाने आणखी तिघांना तिथे बोलावून घेतले. यावेळी सोनटक्के यांना शर्ट काढायला सांगितले. तसेच त्यांच्या हातात असलेल्या पैशाच्या पिशवीची अदला बदल केली. त्यानंतर ही पिशवी घेऊन एक जण बाहेर पडत असताना सोनटक्के यांना संशय आला. त्यांनी ओरडातच त्याचा पाठलाग केला.
हा आरोपी रेल्वे स्टेशनच्या दिशेने पळत होता, तर सोनटक्के हे त्याच्या मागे. त्याचवेळी चार चाकी वाहनातून मनसेचे जिल्हाप्रमुख मॉन्टीसिंग जहागीरदार हे जात होते. त्यांनी आरोपीला पळताना पाहताच गाडीचा वेग वाढवून समोर गाडी आडवी लावत चोरट्याला पकडले. यावेळी त्यांच्या समवेत अब्दुल शफीक, दीपक स्वामी, संतोष सुनेवाड हे मनसे चे पदाधिकारी होते. त्यानंतर चांगला चोप देत वजीराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी आरोपी कडून पैशाची पिशवी जप्त करण्यात आली.
गुन्ह्यात लहान मुलांचा वापरगुन्ह्यात आजकाल सर्रासपणे लहान मुलांचा वापर करण्यात येत आहे. लहान मुलाने वृद्ध शेतकऱ्याला हेरून आपल्या इतर साथीदारांना बोलविले होते.