नांदेड : जिल्ह्यात यंदा सोयाबीनपाठोपाठ कपाशीची लागवड झाली आहे. परंतु, कपाशीच्या उत्पन्नापेक्षा काढण्यासाठी लागलेला खर्च अधिक होत आहे. यंदा अतिवृष्टीने कपाशीचे अतोनात नुकसान झाल्याने आमदनी अठन्नी खर्चा रुपया असे चित्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ कपाशीची ८० हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. कापसाची लागवड करण्यापासून खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींंचा जवळपास एकरी ३० ते ३२ हजार रुपये खर्च जातो. तर प्रतिक्विंटल ५२०० रुपयेप्रमाणे यंदा भाव मिळालेला आहे. त्यात अतिवृष्टीने केवळ एकाच वेचणीत कपाशीची पऱ्हाटी होत आहे. एकरी २ ते ३ क्विंटलचा उतारा निघत आहे. त्यामुळे उत्पादनावर केलेला खर्चही निघणे कठीण बनल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
मजूरही मिळेनातयंदा अतिवृष्टीमुळे कापसाच्या बोंडामध्ये अळ्या पडल्याने कवडीचे प्रमाण वाढले आहे. हा कापूस वेचणीसाठी अवघड जातो. त्यामुळे रोजंदारीवर येणाऱ्या महिला मजुरांनी कापूस वेचणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिकिलो अथवा ठोक दराने कापूस वेचणीस द्यावा लागत आहे.
खर्च सर्वाधिकखत आणि कीटकनाशकावर केला जाणारा खर्च सर्वाधिक असतो. यामध्ये विविध कंपन्यांच्या औषधींची खरेदी करण्यासाठी पाच ते दहा हजार मोजावे लागतात. यामध्ये दोन किंवा तीनच फवारण्या होतात.
यंदा सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर केलेल्या पेरणीतून खर्च काढण्यासाठी पिकांवर अतोनात मेहनत घेतली. परंतु, अतिवृष्टीने हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात शासनाकडूनही केवळ कोरडी आश्वासने दिली जात आहेत. परंतू अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकर्यांना कोणीही वाली नाही. - सुदर्शन पाटील कल्याणकर,शेतकरी
कपाशीचे बिटी बियाणे घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. लागवडीपासून ते वेचणीपर्यंत मुलाप्रमाणे पिकांचे पालनपोषण केले जाते. परंतु, ऐन वेचणीच्या काळात अतिवृष्टीने घात केला. तसेच शासनाकडूनही उत्पादनावर आधारित भाव मिळत नसल्याने तुटपुंज्या भावात पांढरे सोने व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. केलेला उत्पादन खर्चही निघत नाही. - शिवहरी गाढे, शेतकरी