नांदेड : सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे; परंतु ऑक्सिजनचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. त्यातच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनस्तर कमी झाल्यास धावाधाव करावी लागते. त्यामुळे गृहविलगीकरणातील रुग्णांनी घरीच पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढू शकते. असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे घरच्या घरी उपचार घेऊन बरे होण्यासाठी हा उपाय लाभदायी ठरत आहे.
आरोग्य व व कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना विशेषता गृहविलगीकरणात असलेल्यांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. या रुग्णांनी पालथे झोपल्यास त्यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तो काही प्रमाणात कमी होतो. पाठ बेडवर टेकवून उताणे झोपलेल्या रुग्णाला हळुवारपणे पोटावर झोपविण्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. ऑक्सिजनेशन नीट व्हावे म्हणून पालथे झोपविणे या पद्धतीचा स्वीकार आधुनिक वैद्यकशास्त्राने केल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
तसेच रुग्ण जर गृहविलगीकरणात असेल, तर त्याच्या ऑक्सिजनच्या तपासणीबरोबरच तापमान, ब्लेडप्रेशर आणि रक्तातील साखरेची पातळी याची नियमित तपासणी केली जाते. रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणाऱ्या कमतरतेचे निदान झाले नाही, तर गुंतागुंत वाढते. वेळेवर पालथे झोपविल्यास श्वसनास मदत होते. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत, असाही तज्ज्ञांचा अनुभव आहे.
आजघडीला साधारणपणे दहा हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत. त्यातही गृहविलगीकरणात पाच हजार जण उपचार घेत आहेत. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना पालथे झोपण्याचा फायदा होणार आहे.
असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन
पालथे झोपताना एक उशी मानेखाली. दोन उशा छातीखाली तर दोन चेहऱ्याखाली ठेवाव्यात. अर्धा ते दोन तास पालथे व नंतर तेवढाच वेळ उजव्या कुशीवर झोपावे. नंतर अर्धा तास उठून बसावे व अर्धा तास ते दोन तास डाव्या कुशीवर झोपावे. नंतर पुन्हा पालथे झोपावे. अशा प्रकारे वारंवार स्थिती बदलणे उपयुक्त ठरते. हे दिवसात अनेक वेळा करावे. पालथे झोपल्याने श्वसन सुधारते. फुप्फुसातील वायुकोषिका उघडल्या जातात. श्वास घेणे सुलभ होते. हे पालथे झोपण्याचे फायदे आहेत.
त्याचे फायदे काय?
शरीरातील ऑक्सिजनचा स्तर ९५ च्या पुढे असणे आवश्यक आहे; परंतु कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचा ऑक्सिजनस्तर जर त्यापेक्षा कमी असेल आणि ते रुग्ण गृहविलगीकरणात असतील, तर त्यांनी पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा स्तर चांगला वाढतो; परंतु लक्षणे जर तीव्र स्वरूपात असतील, तर त्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे.
-डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक
...तर पालथे झोपू नये
गरोदर असलेल्या महिलांनी पालथे झोपू नये. डीप व्हेन थ्रोबासिससारखे आजार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयाचे गंभीर आजार, पाठीचे मणके, कटिबंध, मांडीचे हाड यांचे फ्रॅक्चर असल्यास, अशा रुग्णांनी पालथे झोपू नये; अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
-डाॅ. सुजाता पाटील, तज्ज्ञ डाॅक्टर
जेवणानंतर पालथे झोपू नका
जेवणानंतर कमीत कमी तासभर तरी पालथे झोपू नका. जोपर्यंत तुम्हाला सहन होईल, तोपर्यंतच पालथे झोपा. एखाद्या व्यक्तीला २४ तासही पालथे झोपेणे शक्य होते; परंतु काहींना अर्ध्या तासातच कंटाळल्यासारखे होते. त्यामुळे आपल्या क्षमतेप्रमाणे पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-डाॅ. अनिल पाटील तज्ज्ञ डाॅक्टर