नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने वाढली. पहिल्या लाटेत बरेच दिवस नांदेड ग्रीन झोनमध्ये राहिले. परंतु, तिसऱ्या लाटेत हजारो बाधितांबरोबरच शेकडोंचा मृत्यूही झाला. आजपर्यंत जवळपास दोन हजार लोकांचा कोरोनाने जीव घेतला. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून सर्वाधिक नुकसान झाले असेल तर ते शिक्षणाचे. शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिक्षण पद्धतीच बदलून गेली आहे. कला शाखा तसेच मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा कधीतरी संगणकाशी येणारा संबंध दररोजच येऊ लागला. त्यात शाळांकडून नियमितपणे ऑनलाइन वर्ग घेतले जात असल्याने पालकांकडे मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅब अशा साधनांची मागणी पाल्यांकडे होऊ लागली. अभ्यासाचे कारण असल्याने पालकांनाही सदर साहित्य खरेदी करून देण्याबरोबरच इंटरनेटची सेवादेखील उपलब्ध करून द्यावी लागत आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. घरातील प्रत्येक विद्यार्थ्यास स्वत:चे साधन हवे. त्यामुळे काही पालकांचा मोबाईल, संगणकावरील खर्च एक लाखाच्या घरात गेला आहे, तर महिन्याकाठी हजार ते दीड हजार रुपयांचे इंटरनेट बिल भरावे लागत आहे.
चौकट
ऑनलाइन वर्ग असले तरी शाळेची फीस पूर्ण भरावी लागतेच. त्यात इंटरनेटचा मासिक खर्च वाढला असून नवीन मोबाइल, लॅपटाॅप अथवा टॅब पैकी काही तरी हवेच असा पाल्यांचा अट्टाहास असतो. त्यामुळे तो प्रत्येकाला स्वतंत्र घेऊन देणे गरजेचे आहे. पालक म्हणून सुविधा पुरविण्यास कमी पडणार नाही, या काळजीतून हजारो रुपये खर्चून साहित्य खरेदी करून द्यावेच लागते.
- साहेबराव भोसले, पालक
शाळांपेक्षा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी नवीन साधनांची गरज असून, त्यांची मागणी काळानुसार बदल असते. जसे हेडफोन ब्ल्यू-टुथचे हवे अथवा कानाला त्रास होणार नााही, अशा गुणवत्तेचे तसेच मोबाइलसुद्धा ४ जी किंवा ५ जी हवा अशा अपेक्षा पाल्यांच्या वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अभ्यासाच्या कारणाने पूर्ण कराव्या लागत आहेत.
- बी. सी. मिटरटकर, पालक