नांदेड : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आता संपत आले असून, आतापर्यंत या साखर कारखान्यांनी १ कोटी ५ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऊस गाळप वाढल्याने शेतकऱ्यांसमोरील प्रश्न मिटला आहे.
मागील तीन-चार वर्षांत पाऊसमान चांगले राहिल्याने उसाचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी उसाचे उत्पादन वाढले आहे. पाण्याची उपलब्धता, सिंचनाच्या वाढत्या सुविधा आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उभा ऊस गाळप करण्याचे आव्हान साखर कारखान्यांसमोर होते.
येथील प्रादेशिक उपसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेडसह परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांचा कारभार पाहिला जातो. या कार्यालयाच्या अंतर्गत एकूण ३० साखर कारखाने असून, त्यापैकी २८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी २ एप्रिलपर्यंत १ कोटी ५ लाख ६० हजार २६३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक ऊस गाळप करण्यात आले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची चिंता दूर झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती गाळपउसाच्या गाळपात लातूर जिल्ह्याने आघाडी घेतली असून, या जिल्ह्यात ४३ लाख ७७ हजार १०६ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. त्या खालोखाल परभणी जिल्ह्यात २८ लाख ९४ हजार ९८३ मे. टन, नांदेड १७ लाख ७४ हजार ४४१ मे. टन आणि हिंगोली जिल्ह्यात १५ लाख ५६ हजार ५५० मे. टन उसाचे गाळप झाले आहे.
जिल्हानिहाय साखर कारखानेपरभणी : ७हिंगोली : ५नांदेड : ६लातूर : १२