नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, यंदा बोगस बियाणे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह इतरही तेलपिके घेतली जातात. परंतु, ती अत्यल्प प्रमाणात आहे. यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात काही पिके घेतली जातात जसे भुईमुग,करडी. यंदाच्या खरिपात ४५५ हेक्टर तीळाचा पेरा झाला होता. त्याचबरोबर इतर गळीत धान्य ७४ हेक्टरवर होते.
रब्बीमध्ये भुईमुगाची पेरणी सुरू असून जवळपास १५ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर करडीचा २ हजार ६३६ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्याचबरोबर जवस ९ हेक्टर आणि इतर गळीत धान्य ९७ हेक्टवर पेरण्यात आले आहे.
चौकट.......
करडी, सूर्यफूल हद्दपार होण्याच्या मार्गावर
जिल्ह्यात सोयाबीनसह करडी, मोहरी, तीळ, भूईमुग, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या पेऱ्यात विक्रमी वाढ हाेत आहे. यंदा सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार असताना ३ लाख ८१ हजार ३८३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. त्यापाठोपाठ रब्बीमध्ये भुईमुगाचा जवळपास १८ हजार हेक्टरवर पेरा होईल. खरिपात भुईमुगाचे पीक कोणीही शेतकऱ्यांनी घेतले नाही. रब्बीमध्ये जवस, तीळ, करडी या पिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये करडी जवळपास २६३६ हेक्टरवर पेरण्यात आली आहे.
कोट.....
जिल्ह्यात तेल पीक जास्त प्रमाणात घेतल्या जात नाही. परंतु, सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जात असून त्यात लक्षणीय वाढ होत आहे. यंदा खरिपात ३ लाख ८० हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा झाला आहे. त्यानंतर तेलपिकामध्ये भुईमुगाचा पेरा असतो तो पंधरा ते वीस हजारांच्या घरात असतो. काही करडी, जवस, सूर्यफूल हे नगण्य असून १०० ते २०० हेक्टरमध्ये असते.
-रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
नांदेड जिल्ह्यात केवळ सोयाबीनच्या माध्यमातून तेल उत्पादित करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु, इतर तेल पीक घेऊनही त्यास योग्य बाजारपेठ मिळणार नाही. त्या भितीने आम्ही इतर पिके घेत नाही. मागील अनेक वर्षापासून सोयाबीनचे पीक घेतो. यंदा सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने काहीच हाती आले नाही.
- त्र्यंबक सूर्यवंशी, शेतकरी