नांदेड : अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे भूजलसाठ्यात झालेली घसरण यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील ८०९ गावे आणि २९० वाड्या टँकरवर विसंबून आहेत. या १०९९ ठिकाणी १०७६ टँकरद्वारे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागविली जात आहे. येणाऱ्या काळात ही टंचाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यतूट, उपलब्ध भूजलाची कमतरता यामुळे पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ४४१ गावे आणि १८४ वाड्यांवर ५९४ पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात २३८ गावे आणि ९८ वाड्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. येथे २८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातही टंचाईची तीव्रता दिसून येते. जिल्ह्यातील ११ गावे आणि ६ वाड्यांसाठी २२ शासकीय आणि १५० खाजगी अशा १७२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ गावांत टंचाईची तीव्रता आहे. येथे ५ शासकीय आणि ८ खाजगी अशा १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर लातूर येथे ३ गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. अशीच स्थिती नांदेड जिल्ह्यातही असून जिल्ह्यातील ३ गावे आणि २ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या भीषणतेची आताच चिंता लागून राहिली आहे.
महिन्यात वाढले २६९ टँकरडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यातील ६२५ गावे आणि ८७ वाड्यांना ७९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र अवघ्या महिनाभरात टँकरची संख्या सुमारे २६९ ने वाढली आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात हीच संख्या १०७६ टँकरवर पोहोचली आहे. येणाऱ्या काळात टंचाईची स्थिती तीव्र होण्याचे संकेतच यातून मिळत आहेत.