नांदेड : कोरोनामुळे भविष्याची चिंता, जवळच्या लोकांचा होणारा मृत्यू, आर्थिक नुकसान, कौटुंबिक समस्या यासह इतर कारणांमुळे मानसिक ताणात वाढ झाली आहे. अनेक दिवस घरातच अडकून पडल्याने अनेकांचा स्वभाव चिडचिडा झाला आहे. या ताणतणावात आता जगायचे कसे? असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे; परंतु तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेतल्यास या ताणतणावातून सहज बाहेर पडता येते.
अनेकवेळेला ताण-तणाव निर्माण करण्यासाठी कारणे, घटना, परिस्थिती महत्त्वाची नसते, तर त्यासोबत आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो, कसा प्रतिसाद देतो हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातल्या त्यात मानसिक प्रतिसाद, त्या परिस्थितीबद्दल शंका, समज-गैरसमज, आपले विचार, शंका आणि भीती म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा असतो. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेष करून कोरोना झालेले आणि अद्याप ज्यांना बाधा झाली नाही, असे रुग्णही मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येत आहेत.
महामारीच्या काळात मानसिक तणाव वाढला आहे. यामध्ये शंकाच नाही; परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकदम घाबरुन, भांबावून न जाणे. परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे. कोणत्याही प्रकारची टोकाची नकारार्थी प्रतिक्रिया न देणे, परिस्थितीवर विजय मिळविण्याचा शंभर टक्के प्रयत्न करण्याची गरज आहे. कधी कारणे किंवा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यावेळी शक्यतो त्याकडे दुर्लक्ष करणे महत्त्वाचे आहे. नको असलेल्या घटना घडल्यानंतर त्याचा सर्व दोष स्वत:वर घेणे टाळावे. मित्र, आप्तेष्ट, गुरुजन यांच्याशी नेहमी संवाद साधून त्यांचा सल्ला घेणे, आहार, निद्रा आणि शारीरिक श्रम या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. ताण हा घटनेमुळे कमी आणि त्या घटनेला दिलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे जास्त जाणवतो. म्हणून आपल्या भावनिक प्रतिसादाकडेही बारकाईने लक्ष द्या. गरज पडल्यास त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे.
- डॉ. रामेश्वर बोले,
मानसोपचार तज्ज्ञ
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांचा रोजगार बुडाला आहे, तर काहींच्या नोकरीही गेल्या आहेत. त्यामुळे हे सर्वजण सध्या तणावात आहेत. त्यात तरुणवर्गही अडचणीत आला आहे. त्यांच्या हाताला सध्या काम नाही. इतर ठिकाणी कामासाठी जाण्याचीही सोय नाही. गावाकडे खाणारी तोंडे अनेक अन् कमावते दोनच हात. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न त्यांना सातत्याने भेडसावत आहेत. याच कारणामुळे ते मानसिक तणावात जगत आहेत. त्यातूनच त्यांना मानसिक आजाराचे ग्रासले असल्याचे दिसून येते.
कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?
अनेकवेळा मानसिक तणावात असलेले पुरुष कुटुंबातील सदस्यांसमोर व्यक्त होत नाहीत. आपल्याला होणारा त्रास ते सांगत नाहीत; परंतु मित्रांमध्ये मात्र ते मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे घरातील सदस्य मानसिक तणावात असल्याचे दिसून आल्यास मित्रांशी संपर्क साधून त्यांच्या मनात नेमके काय चालले? याचा कानोसा घ्यावा. गरज पडल्यास सर्व सदस्यांनी मिळून त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.