नांदेड : येथील विमानतळावर कोणत्याही भौतिक सुविधा उभारल्या नसल्याने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, हे विमानतळ चालविण्यासाठी रिलायन्स कंपनी ठेवायची की बदलायची, याबाबत आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १० जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विमानतळ असतानाही येथील विमानसेवा बंद आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत ८ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सामंत यांनी गुरुवारी विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर येथे उभारले नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. जागोजागी अस्वच्छता, स्वच्छतागृह, उद्यानाची दुरवस्था यासह इतर अनेक असुविधा पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. या पाहणीनंतर दुपारी सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
ते म्हणाले, नांदेड विमानतळाचे काम रिलायन्स कंपनीकडे आहे. आजच्या पाहणीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून चांगली उत्तरे मिळाली नाहीत. कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने येथे उभारले नाही. केवळ प्रवासी नाहीत, असे कारण देऊन विमानसेवा बंद केली, हे उचित नाही. कंपनीने इन्फ्रास्ट्रक्चर उभारले असते तर विमानसेवा सुरळीत राहिली असती. या विमानतळाची नाईट लँडिंग सुरू आहे. रन-वे चांगला आहे. येत्या दोन दिवसांत ‘एमआयडीस’च्या अधिकाऱ्यांकडून इन्फ्रास्ट्रक्चरची कामे केली जात आहेत. येथील लोकप्रतिनिधींनी देखील रिलायन्स कंपनी बदला, अशी मागणी केली आहे. तेव्हा येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन विमानतळ एमआयडीसीने चालवायचे की, रिलायन्सकडेच ठेवायचे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांमत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला खा. हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.
साडेबावीस कोटी मंजूरनांदेड एमआयडीसीतील रस्त्यांची कामे २५ वर्षांपासून झाली नाहीत. रस्त्यांच्या कामासाठी २२.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. किनवट एमआयडीसीच्या रस्त्यांसाठी अडीच कोटी रुपये मंजूर केले असून, हदगाव येथील एमआयडीसीबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सामंत यांनी सांगितले.