कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विंवचनेत अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरू झाले होते. परिस्थिती पूर्वपदावर येत होती; परंतु आता परत एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि उत्पादन विस्कळीत झाले आहे. पर्यायाने किराणा साहित्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
होलसेलमध्ये पंधरा दिवसांपूर्वी तेल ११६ ते १२० रुपये किलो होते. तो दर आता तब्बल १४८ रुपयांवर गेला आहे. साखरेमागेही साधारणता तीन रुपयांची वाढ होऊन ती ३६ रुपये किलो झाली आहे. तूरडाळ ७१ ते ७५ रुपये किलो होती. ती आता होलसेलमध्ये ९३ रुपये, तर रिटेलमध्ये १२० रुपये किलोने मिळत आहे. चनाडाळ ४९ रुपयांवरून ६२ रुपये किलो झाली आहे. गूळ २ हजार ५०० रुपये क्विंटल होता. तो ३ हजार ५०० रुपये क्विंटल झाला. डालडा ३५ रुपये किलोवरून तब्बल १०० रुपये किलो झाला आहे. तांदूळमागे तब्बल २०० रुपये वाढले आहेत. शेंगदाणे १०५ रुपयांवरून १२० रुपये किलो झाले आहेत. हे सर्व भाव होलसेलचे आहेत. प्रत्यक्षात किराणा दुकानात यापेक्षा अधिक दराने विक्री करण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
घ्यायचे सामान तर घ्या
दरम्यान, शहरातील मोंढा भागातून किराणा साहित्याची होलसेलमध्ये खरेदी करण्यात येते. या ठिकाणी खरेदीसाठी गेल्यानंतर होलसेलवाले किराणाचे अव्वाच्या सव्वा दर लावत आहेत. याबाबत विचारणा केल्यास घ्यायचे तर घ्या, असा उद्धटपणे सल्ला देण्यात येतो. आम्हालाच अधिक भावाने हा माल मिळत असल्यामुळे ग्राहकांनाही तो महाग मिळतो, अशी प्रतिक्रिया किराणा विक्रेता वैजनाथ स्वामी यांनी दिली.