नांदेड : अनुदानित तासिका तत्त्वावर विविध महाविद्यालयांत काम करणाऱ्या प्राध्यापकांना शासनाच्या एचटीई सेवार्थ प्रणालीद्वारे वेतन अदा करण्यात येणार असून याबाबतचे पत्र विभागीय संचालकांनी प्राचार्यांना दिले आहे़ मागील आठ महिन्यांपासून तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे अजूनही वेतन मिळाले नाही़ मात्र, सेवार्थ प्रणालीद्वारे वेतन अदा करण्याचा नवा फार्स विभागीय संचालकांनी चालविला आहे़
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत विविध महाविद्यालयांत अनुदानित तासिका तत्वावर विविध प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सदरील प्राध्यापकांची निवृत्ती होवून जवळपास आठ महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ अनेक महाविद्यालयांनी तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या वेतनासंदर्भात देयके विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत़ मात्र अद्यापपर्यंत विभागीय सहसंचालकाकडून प्राध्यापकांचे मानधन देण्यासंबंधी कार्यवाही झाली नाही़ प्राध्यापकांच्या वेतनासाठी ४ कोटी ७० लाख रूपये पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे़ रखडलेले मानधन अदा करण्याऐवजी विभागीय सहसंचालक कार्यालयाने आता नवीन आदेश काढून तासिका तत्त्वावरील कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांना शासनाच्या एचटीई सेवार्थ प्रणालीनुसार मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे़ यासंदर्भातील माहिती महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून मागवण्यात आली आहे़
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती काही काळापुरतीच असते़ आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून त्या महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही़ असे असताना उरलेल्या काही महिन्यांसाठी सेवार्थ प्रणाली लागू करून काय उपयोग आहे, अशी प्रतिक्रिया प्राध्यापकांंनी व्यक्त केली़ रखडलेले मानधन देण्याऐवजी विभागीय संचालकांनी सेवार्थ प्रणालीचा नवा नियम कशासाठी लागू केला हे मात्र कोडेच आहे़ दरम्यान, महाविद्यालयांनी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रपत्र अ मध्ये माहिती देताना महाविद्यालयांचे नाव, तासिका तत्त्वावरील अध्यापकांची संख्या, तासिका तत्वावर नियुक्त अध्यापकांचे नाव, तासिका तत्वावरील नियुक्ती तारीख, देण्यात आलेला कार्यभार, नियुक्तीचा कालावधी, विद्यापीठ मान्यतेचा क्रमांक आदी माहितीसह विभागीय सहसंचालकांनी महाविद्यालयांना दिलेले नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे़
दरमहा वेतन देण्याचा निर्णय थंडबस्त्यातराज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून १४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार तासिका तत्त्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांना दरमहा वेतन द्यावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ परंतु या निर्णयाची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही़ मागील आठ महिन्यांचे रखडलेले मानधन देण्याचे सोडून विभागीय संचालक कार्यालय सेवार्थ प्रणालीचा आदेश काढून मानधन देण्यासाठी वेळकाढूपणा करत आहे़ - प्रा़ डॉ़ राजेश कुंटूरकर, नांदेड