नरसी फाटा (जि़ नांदेड ) : नागरिकांना दुप्पट व तिप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या टोळीचा रामतीर्थ पोलिसांनी २ एप्रिल रोजी मुसक्या आवळल्या. या टोळीने अनेक नागरिकांना गंडविले असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली असून, आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे.
नायगाव, देगलूर व कर्नाटकात असे अमीष दाखविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी प्रभू शिवकांत जाधव (४० रा. चिखली ता.औराद जि. बीदर, कर्नाटक, हल्ली रा. जोशी गल्ली देगलूर) याला अज्ञात तीन व्यक्तींनी फोन करून तुला दुप्पट, तिप्पट पैसे करून देतो, असे म्हणून विश्वासात घेतले. यानंतर त्याला नांदेड येथे बोलावून त्याच्याकडून ८० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर हे तिघे जाधव यास भेटण्याचे टाळत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी ही माहिती देगलूर पोलिसांना दिली.
पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून फिर्यादीच्या मदतीने आरोपी अरणथ सैलाब आदिवासी (४०), इंद्रपाल दरोगाजी आदिवासी (३७), अरविंद रामकिशन गौड (३० रा.मु़पो.साहेगाड जि़ सागर मध्य प्रदेश) यांना पकडले. त्यांच्याजवळ एक मोटारसायकल व दोन मोबाईल मिळून आले. यानंतर या आरोपींना देगलूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिखलीकर यांनी दिली. सदर आरोपींनी अशाप्रकारे किती जणाला फसवले यांचा तपास पोलीस करत आहेत. नरसी येथील कारवाईत स.पो.नि.सोमनाथ शिंदेसह सहभागी होते़
असा रचला सापळाया टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी फिर्यादीला पुन्हा त्यांच्यासोबत संपर्क साधायला लावला. तुम्हाला माझे नातेवाईक आणखी पैसे देणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मंगळवारी नरसी चौकात भेटण्याचे ठरविले. यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे स.पो.नि. सोमनाथ शिंदे,पोलीस जमादार करले, जीपचालक भोळे, शिंदे, राठोड आदींनी नरसी फाटा येथे सापळा रचून रात्री ८ वाजता आरोपींच्या मुसक्या आवळल्या.