नांदेड : महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथील घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. हदगाव येथील पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात वातावरण आणखी चिघळले आहे. यामुळे जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले आहेत.
हदगाव येथे पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील वातावरण आणखी शांत झाले नाही. याबाबत सोशल मिडियावरून अफवा पसरवू नयेत व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्ह्याधिकारी अरुण डोंगरे यांनी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
शांतता समितीची बैठक ठरली वादळी
जिल्हाधिकारी कार्यालयात बचतभवन येथे बुधवारी सायंकाळी झालेली शांतता समितीची बैठक वादळी ठरली़ आ.डी.पी.सावंत, आ.हेमंत पाटील यांच्यासह महापौर शीलाताई भवरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, भदंत पैय्याबोधी आदींनी जिल्हाधिकार्यांसमोर प्रशासनाला धारेवर धरले़ या बैठकीत पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर करत महिला, मुले, वृद्धांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध केला. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, मात्र घरातील चिमुकली मुले, महिला, वृद्धांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण कशासाठी, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला.